mewalal choudhari resin

पाटणा. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाले असले तरी हे सरकार प्रारंभापासूनच वादात अडकले आहे. नव्या सरकारमधील नवनिुयक्त शिक्षणमंत्री डॉ. मेवालाल चौधरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच त्यांनी पदाचा राजीनामा दिला. मेवालाल चौधरी यांनी गुरुवारीच पदभार स्वीकारला होता. त्यानंतर केवळ दोनच तासात त्यांनी पदाचा राजीनामा दिला. नितीशकुमारांनी मेवालाल चौधरी यांना आपल्या नवीन सरकारमध्ये शिक्षणमंत्री केले आहे तेव्हापासून विरोधी पक्ष त्यांच्यावर सतत हल्ला करत होते आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली जात होती. राजीनाम्यापूर्वी मेवालाल यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत अर्धा तास चर्चाही केली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती. सबौर विद्यापीठाचे कुलगुरू असताना भरती घोटाळ्याचे त्यांच्यावर आरोप असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांसोबत अर्धा तास चर्चा

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंत्री मेवालाल चौधरी यांना बोलावून घेतले. यानंतर मेवालाल हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीच काय चर्चा झाली हे समोर आलेलं नाही. पण मेवालाल चौधरीसंदर्भात नितीशकुमार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे असे मानले जात आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत मेवालाल यांची अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेनंतर मेवालाल यांनी यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

काय घडले… सारेच गुलदस्त्यात

बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री निवासस्थानी म्हणजेच अणे मार्गावर एक पांढऱ्या रंगाची टोयोटा एसयूव्ही वेगाने धडकली. गाडीसमोर शिक्षणमंत्र्याचा बोर्ड लागला होता. गाडीत स्वत: शिक्षणमंत्री मेवालाल होते. ही गाडी अर्ध्या तासानंतर बाहेर आली. तथापि या बैठकीत कोणत्या मुद्यावर चर्चा झाली हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

भरतीत घोटाळा केल्याचा आरोप
२०१७ मध्ये मेवालाल चौधरी यांनी भागलपूरमधील सबौर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू असताना भरतीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे. कुलगुरू असताना त्यांनी चुकीच्या पद्धतीने १६१ सहाय्यक प्राध्यापकांना पुन्हा नियुक्त केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. त्यावेळी बिहारचे तत्कालीन राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी मेवालाल चौधरी यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. मेवालाल चौधरी यांच्यावरील आरोप सत्य असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. सबौर कृषी विद्यापीठाच्या इमारतीच्या बांधकामातही घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पत्नीच्या मृत्यूचे प्रकरणही ऐरणीवर

मेवालल चौधरी शिक्षणमंत्री होताच त्यांच्याविरोधातील प्रकरणे आता उकरणे सुरू झाले आहे. भरती घोटाळ्यात नाव समोर आल्यानंतर आता मेवालाल चौधरींच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशीही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावर माजी आयपीएस अधिकारी अमिताभ दास यांचे कथित पत्र व्हायरल हत असून त्यात डीजीपीद्वारे मेवालाल यांच्या पत्नीच्या मृत्यूसंदर्भात त्यांची चौकशी करण्याची परवानगी मागिण्यात आली होती. मेवालाल यांची पत्नी निता चौधरी २०१०-२०१५ दरम्यान तारापूर येथील आमदार होत्या. राजकारणात त्या सक्रिय होत्या. २०१९ मध्ये सिलिंडर स्फोटात त्या होरपळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला होता.