nitish kumar

पाटणा.  बिहारमधील विधानसभेत भाजपा-जदयूने विजय मिळवला आहे. महाआघाडीला या निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. मंगळवारी नितीश कुमारांसोबत इतर काही मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी स्वतःजवळ गृह, सामान्य प्रशासन, मंत्रिमंडळ सचिवालय अशी महत्वाची मंत्रीपदे घेतली आहेत. तर भाजपाच्या ताराकिशोर प्रसाद यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. प्रसाद यांना अर्थ, नगरविकास, पर्यावरण मंत्रालयांची जबाबदारी दिली आहे. नितीश कुमारांच्या नवीन सरकारमध्ये काही मंत्री कमी शिकलेले असूनही त्यांना महत्वाची मंत्रीपदे दिली आहेत. तसेच काही मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांचीही नोंदही आहे.

प्रसाद यांच्याकडे ६ विभाग
प्रसाद यांच्याकडे ६ विभागांची जबाबदारी दिलेली आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेले ताराकिशोर प्रसाद यांच्याकडे अर्थ मंत्रालयासह नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे.  तारकिशोर प्रसाद यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. संपूर्ण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या एनडीएने महागठबंधनचे नेते तेजस्वी यादव यांच्या शैक्षणिक पात्रतेवरुन अनेकदा टोले लागवल्याचे पाहायला मिळालं. तेजस्वी यांनी दहावी पर्यंतचेही शिक्षण पूर्ण केलेले नाही असे अनेकदा प्रचारसभांमधून सांगण्यात आले होते.

मेवालाल चौधरीही वादग्रस्त
नितीश यांच्या मंत्रीमंडळामध्ये मंत्रीपद मिळालेले आणखीन एक नाव म्हणजे मेवालाल चौधरी. चौधरी हे सुद्धा वादग्रस्त नेतृत्व असून त्यांच्या खांद्यावर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मेवालाल चौधरी २०१५ मध्ये पहिल्यांदा जेडीयूच्या तिकीटावर आमदार झाले होते. त्यापूर्वी ते शिक्षक म्हणून काम करायचे. चौधरी हे सबौर कृषि विश्वविद्यालयाच्या कुलपती असताना २०१२ साली सहाय्यक प्राध्यपक आणि कनिष्ठ संशोधकांची भरती करण्यात आली होती. मात्र या भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. बिहारमध्ये १८ आणि इतर राज्यांमध्ये ८७ जणांना नियमांचे उल्लंघन करुन चौधरी यांनी नियुक्त केल्याचे आरोप करण्यात आले. या प्रकरणामध्ये चौधरी यांना न्यायलयाने अंतरिम जामीन दिला होता. तसेच न्यायालयाने चौधरी यांच्याविरोधात चार्टशीट दाखल केली नव्हती.

जीवेश मिश्रांवरही आरोप

नितीश यांच्या मंत्रीमंडळामध्ये जीवेश कुमार यांना पर्यटन, कामगार आणि खाण मंत्रालय देण्यात आले आहे. जीवेश हे सुद्धा वादग्रस्त नेतृत्वांपैकी एक आहेत. जीवेश यांनी कोरोना कालावधीमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत. निर्बंध लावण्यात आलेले असताना जीवेश मात्र दिल्लीपासून थेट दरभंगापर्यंत आले होते. त्यांनी आपल्या मतदारसंघामध्येही दौरा केला होता. मात्र त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली नव्हती.

मेवा मिळताच भाजपाचे मौन

पहिल्या कॅबिनेट बैठकीत तेजस्वी १० लाख नोकऱ्या देण्यासाठी वचनबद्ध होते परंतु नितीशकुमार यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये नियुक्त्यांमध्ये घोटाळा करणाऱ्या मेवालाल यांना मंत्रिपद देऊन आपला उद्देश स्पष्ट केले. कालपर्यंत भाजपवाले मेवालाल यांना शोधत होते आणि आज मेवा मिळताच मौन धारण केले, हीच राजकारणाची शोकांतिका आहे.

लालू प्रसाद यादव, राजद प्रमुख

तेजस्वींचा हल्लाबोल

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी असिस्टंट प्रोफेसरच्या नियुक्तीत तसेच भवन निर्माणच्या भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणातील भादंविचे कलम ४०९,४२०,४६७, ४६८,४७१ आणि १२०बी च्या अंतर्गत आरोपी असलेल्या मेवालाल चौधरी यांना शिक्षण मंत्री बनवून भ्रष्टाचार करणाऱ्यांना बक्षिस अथावा लुटण्याची खुली सूट देऊ केली आहे का?

- तेजस्वी यादव, राजद नेते