‘मी भारतात पाऊल ठेवल्यावर कोरोनाचा होईल अंत’, स्वयंघोषित संत नित्यानंदने उधळली मुक्ताफळे

नित्यानंदने(Nityanand) देवीने माझ्या अध्यात्मिक शरीरामध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं. मी जेव्हा भारतामध्ये पाऊल ठेवेन त्याचवेळी कोरोना(Corona) भारतामधून नष्ट होईल, असे म्हटले आहे.

    देशामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र अशातच स्वयंघोषित संत नित्यानंदचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मी भारतामध्ये पाऊल ठेवल्यानंतरच कोरोनाचा कहर थांबेल आणि कोरोना पूर्णपणे नष्ट होईल, असा दावा या व्हिडिओमध्ये तो त्याच्या भक्तांसमोर करताना दिसत आहे.

    काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नित्यानंदचा एक भक्त त्याला भारतामधून कोरोना कधी नष्ट होणार असा प्रश्न विचारतो. त्यावर उत्तर देताना नित्यानंदने देवीने माझ्या अध्यात्मिक शरीरामध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं. मी जेव्हा भारतामध्ये पाऊल ठेवेन त्याचवेळी कोरोना भारतामधून नष्ट होईल, असंही पुढे नित्यानंद म्हणाला आहे.

    नित्यानंदने १९ एप्रिल रोजी भारतामध्ये कोरोना लाटेच्या दुसऱ्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्याने वसवलेल्या कैलासा देशात भारतीय भक्तांना प्रवेशबंदी जाहीर केली होती. त्याने ब्राझील, युरोपीयन देश आणि मलेशियामधून येणाऱ्या भक्तांवरही बंदी घातलीय. करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आदेश काढताना जगभरातील आश्रमही बंद करण्याच्या सूचना नित्यानंदने दिल्या होत्या. तसेच आश्रमातील भक्तांनाही कैलासात प्रवेश नाकारण्यात आला आहे. नित्यानंदने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली होती.