अप्रायजलला यंदाही डसणार कोरोना, सलग दुसऱ्या वर्षी कर्मचाऱ्यांची घोर निराशा

नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाचे आकडे कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. अर्थचक्राचा गाडा पुन्हा रुळावर येऊ लागला होता. त्यामुळे यंदा तरी कंपन्या जोमाने चालतील आणि आपल्याला पगारवाढ मिळेल, अशी आशा कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली होती. मात्र यंदा पुन्हा एकदा फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. 

    कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केलीय. गेल्या वर्षी अचानकपणे कोरोनाचं संकट जगासमोर उभं राहिलं. त्यापाठोपाठ आलेल्या लॉकडाऊननं सर्वसामान्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलं. यात इतर सर्व घटकांप्रमाणे हाल झाले ते नोकरदार मंडळींचे.

    गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कडक लॉकडाऊन असल्यामुळे कंपन्यांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला होता. परिणामी बहुतांश कंपन्यांमध्ये अप्रायझल्स झालेच नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार वाढणे तर सोडाच, अनेकांचा पगार कमी करण्यात आला. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. अनेक कंपन्याच बंद पडल्यामुळं नोकरदार रस्त्यावर आले.

    नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाचे आकडे कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. अर्थचक्राचा गाडा पुन्हा रुळावर येऊ लागला होता. त्यामुळे यंदा तरी कंपन्या जोमाने चालतील आणि आपल्याला पगारवाढ मिळेल, अशी आशा कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली होती. मात्र यंदा पुन्हा एकदा फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने डोके वर काढायला सुरुवात केली आहे.

    देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात असल्यामुळे शहरी भागात सध्या मिनी लॉकडाऊन करण्यात आलंय. अनेक कंपन्यांच्या उत्पादनावर याचा परिणाम होऊ लागला आहे. आवश्यक आणि जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर इतर सर्व व्यापार यामुळे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा हा कोरोना आपलं अप्रायजल खाऊन टाकणार की काय, अशी भीती कर्मचाऱ्यांना वाटू लागली आहे.

    त्यात महाराष्ट्र सरकारकडून रोज वेगवेगळ्या सूचना येत असून हळूहळू लॉकडाऊनच्या दिशेनंच पावलं पडू लागल्याची भीती कर्मचाऱ्यांना ग्रासू लागली आहे. त्यामुळं गेल्या वर्षी नोकरी टिकली यातच समाधान मानणाऱ्या नोकरदार वर्गाला यंदादेखील त्यातच समाधान मानावे लागणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. वाढती महागाई आणि सलग दोन वर्षं पगारवाढ नसल्यामुळे सामान्यांचे बजेट अगदीच कोलमडले आहे.