पाकिस्तानने मर्यादा ओलांडू नये, सीमापार आलात तर पुन्हा होईल सर्जिकल स्टाईक, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानला बजावलं

पुंछमध्ये जेव्हा हल्ला झाला होता, तेव्हा पहिल्यांदा सर्जिकल स्टाईक करत भारताने जगाला दाखवून दिले की भारताच्या सीमांशी छेडछाड करणे हे इतके सोपे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात भारताने आपल्या सीमांची सुरक्षा आणि सन्मान सिद्ध केला होता, असे अमित शाह म्हणाले. दक्षिण गोव्यात राष्ट्रीय फोरेन्सिक विज्ञान विद्यापीठाचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

  पणजी – काश्मीरात गेल्या काही दिवसांपासून सुरु झालेल्या दहशतवादी कारवायांवर, पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संताप व्यक्त केला आहे. काश्मीरात सुरु असलेल्या कारवायांमागे असलेल्या पाकिस्तानला त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानने काश्मीरमध्ये दखल देण्याची चूक करु नये, त्यांनी त्यांच्या मर्यादेत राहावे. जर शेजारच्या देशांनी सीमा ओलांडल्या तर भारताकडून पुन्हा एकदा सर्जिकल स्टाईकसारखे पाऊल उचलण्यास मागेपुढे पाहिले जाणार नाही, असा सज्जड इशाराच त्यांनी पाकिस्तानला दिला आहे.

  देशांच्या सीमांवर होणारे आक्रमण सहन करणार नाही

  पुंछमध्ये जेव्हा हल्ला झाला होता, तेव्हा पहिल्यांदा सर्जिकल स्टाईक करत भारताने जगाला दाखवून दिले की भारताच्या सीमांशी छेडछाड करणे हे इतके सोपे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात भारताने आपल्या सीमांची सुरक्षा आणि सन्मान सिद्ध केला होता, असे अमित शाह म्हणाले. दक्षिण गोव्यात राष्ट्रीय फोरेन्सिक विज्ञान विद्यापीठाचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

  माजी केंद्रीय मंत्री पर्रिकरांची आठवण

  यावेळी त्यांनी माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आठवणी जागवल्या. पर्रिकरांना दोन गोष्टींसाठी कायम स्मरणात राहतील, असे त्यांनी सांगितले. त्यांनी गोव्याला त्याची ओळख मिळवून दिली आणि तिन्ही सैन्यदलांना वन रँक वन पेन्शन मिळवून दिले. या दोन बाबींसाठी पर्रिकर कायम सगळ्यांच्या स्मरणात राहतील असे त्यांनी सांगितले.

  गोवा निवडणुकांची तयारी

  गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून, अमित शाह यांचा दौरा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा आहे. अमित शाह यांनी या भेटीत भाजपाच्या राज्यातील कोअर कमिटीसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या. गोव्याची जबाबदारी प्रभारी म्हणून देंवेंद्र फडणवीसांकडे देण्यात आली आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेससह शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि आपही इथे मैदानात उतरणार आहेत. ममता बॅनर्जी स्वता राज्यात प्रचारात उतरतील.