पीएम मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बोलावली बैठक, संपूर्ण देश पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

राज्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने नियम कडक केले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये देशातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.

    नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. कोरोनाची लसही मोठ्या प्रमाणावर दिली जात आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे.

    महाराष्ट्रातील नागपूरसह काही ठिकाणी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. पंजाबच्या आठ जिल्ह्यांत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. राज्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने नियम कडक केले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये देशातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.

    कोरोनाचे २६ हजारांहून अधिक नवे रुग्ण सोमवारी आढळून आले. गेल्या ८५ दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. २० डिसेंबर रोजी कोरोनाचे २६,६२४ नवे रुग्ण सापडले होते. देशात कोरोनाचे १ कोटी १३ लाख रुग्ण असून, त्यातील १ कोटी १० लाख रुग्ण बरे झाले. दरम्यान, महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना एक आठवडा क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. मध्य प्रदेशने छिंदवाडा, बालाघाट, बैतूल, सिओनी, खांडवा, बारवानी, खरगोन, बुऱ्हाणपूर या आठ सीमावर्ती जिल्ह्यांच्या प्रशासनाला तसे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्रातही १५००० हून अधिक रुग्ण सापडले आहेत.