सबमरीन ऑप्टिकल फायबर केबलचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण; मोबाईल, लँडलाईन दूरसंचार सेवा होणार अत्यंत जलद

सबमरीन केबलमुळे चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्वीप (हॅवलॉक), लिटल अंदमान, कार निकोबार, कामोरता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड व रंगत हे आठ द्वीपसमूह जोडले जाणार आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांवरही मोबाईल, लँडलाईन दूरसंचार सेवा अत्यंत जलद होईल.

नवी दिल्ली : चेन्नई ते अंदमान-निकोबारदरम्यान २३०० कि.मी. लांबीच्या अत्याधुनिक सबमरीन ऑप्टिकल फायबर केबलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण होणार आहे. युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (यूएसओएफ) च्या देखरेखीत हा प्रकल्प पूर्ण झाला.

सबमरीन केबलमुळे चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्वीप (हॅवलॉक), लिटल अंदमान, कार निकोबार, कामोरता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड व रंगत हे आठ द्वीपसमूह जोडले जाणार आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांवरही मोबाईल, लँडलाईन दूरसंचार सेवा अत्यंत जलद होईल. दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पास पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात झाली होती.

चेन्नई ते पोर्ट ब्लेअरदरम्यान सबमरीन ओएफसी लिंक २७२०० जीबीपीएस प्रतिसेकंद बँडविड्थ असणार आहे. पोर्ट ब्लेअर व इतर बेटांदरम्यान २७१०० जीबीपीएस असणार आहे. ४ जी मोबाईल सेवेत मोठी सुधारणा यामुळे होईल. कनेक्टिव्हिटी वाढल्याने या बेटांवर पर्यटन उद्योग वाढेल. स्थानिकांचे जीवनमान उंचावेल. टेलिमेडिसिन, टेली-एज्युकेशन व ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी सुलभ होईल. लहान उद्योजकांना ई-कॉमर्समुळे संधी निर्माण होतील. बीएसएनएलने या प्रकल्पाची अंमलबजावणी केली. टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंटस् इंडिया लिमिटेड प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार कंपनी आहे. प्रकल्पासाठी १२२४ कोटी रुपये खर्च करण्यात आले.