पंतप्रधान  मोदी करणार ७५ रुपयांच्या नाण्याचे अनावरण

आंतरराष्ट्रीय अन्न आणि कृषी संस्थेच्या (Food and Agriculture Organization) स्थापनेला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. याच्या गौरवार्थ भारताकडून ७५ रुपयांच्या नाण्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार, १६ ऑक्टोबर या दिवशी करण्यात येणार आहे.

संस्थेच्या अमृत महोत्सवाप्रित्यर्थ (75th anniversary) ७५ रुपयांच्या या गौरवपर नाण्याचं (commemorative coin) अनावरण होणार आहे. याशिवाय भारतीयांनी संशोधन केलेल्या ८ पिकांचे १७ नवीन जैविक नमुने (bio-fortified varieties) देशाला समर्पित करण्यात येणार आहेत.  देशातील कुपोषण (malnutrition) आणि भूकबळी (hunger) नष्ट करणे, हा सरकारचा अग्रकम असल्याची प्रतिक्रिया कृषी मंत्रालयाने दिली आहे. या कार्यक्रमाला अंगणवाडी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, केंद्रीय कृषी मंत्री, अर्थमंत्री आणि महिला बालविकास मंत्री उपस्थित असतील.

अन्न व कृषी संस्थेची स्थापना ६ ऑक्टोबर १९४५ या दिवशी कॅनडामध्ये झाली. संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे मुख्यालय इटलीची राजधानी असणाऱ्या रोम शहरात आहे. या संस्थेसोबत भारताच्या संबंधांचा इतिहास मोठा आहे. डॉ. विनय रंजन सेन या भारतातील सनदी अधिकाऱ्यांनी १९५६ ते १९६७ या कालावधीत या संस्थेचे महासंचालक पद भूषवले होते. यावर्षी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलेला ‘द वर्ल्ड फूड प्रोग्राम’ (The World Food Programme) ची मुहूर्तमेढ डॉ. सेन यांच्या कार्यकाळातच रोवली गेली होती. शिवाय २०१६ हे आंतरराष्ट्रीय डाळ वर्ष (International Year of Pulses) घोषित करण्याच्या भारताची कल्पनेचा एफएओनं चांगलाच प्रचार केला होता.

शुक्रवारी अनावरण होणाऱ्या ८ नव्या नमुन्यांमुळे भारतीयांच्या दैनिक आहारातील पोषणमूल्य तिपटीने वाढेल, असा दावा केला जात आहे. भारतीय थाळीचं रुपांतर पोषण थाळीत होईल, असा दावा कृषी मंत्रालयाने केला आहे.