गंगेतील डुबक्यांवर पोलिसांची पाळत; तीनच डुबक्या मारण्याची परवानगी!

मकरसंक्रांतीनंतर कुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातील भाविक दाखल होतात. यामुळे सुरक्षेच्या कारणातून संवेदनशील असलेल्या हरकी पैडीवर स्नान करणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते. येथे दर ५ मिनिटाला १०००० भाविक स्नान करतात. काही विशेष पर्वावर येथे तुफान गर्दी उसळते.

हरिद्वार. हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सुमारे सात लाख भाविकांनी हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठावर पवित्र स्नान केले.  आरतीवेळी धार्मिक विधीमध्येही ७ लाख ११ हजार भाविकांनी सहभाग घेतला. कुंभ मेळ्यामध्ये पवित्र स्नानादरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने नवे नियम लागू केले आहे.

आता भाविकांच्या गंगेतील डुबक्यांवर पोलिसांची पाळत असणार आहे. नदी पात्रात जावून पवित्र गंगा स्नान करताना होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक भाविकाने केवळ तीन डुबक्या मारून बाहेर पडावे, अशी योजना आखण्यात आली आहे. यामुळे भाविक अधिक काळ नदीपात्रात थांबणार नाहीत.

भाविकांची होते मोठी गर्दी

मकरसंक्रांतीनंतर कुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातील भाविक दाखल होतात. यामुळे सुरक्षेच्या कारणातून संवेदनशील असलेल्या हरकी पैडीवर स्नान करणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते. येथे दर ५ मिनिटाला १०००० भाविक स्नान करतात. काही विशेष पर्वावर येथे तुफान गर्दी उसळते. यामुळे हरकी पैडी आणि जवळपासच्या घाटांवर भाविकांची मोठी गर्दी होते. अशावेळी एखादी अनुचित घटना घडल्यास मोठी जीवितनहानी होण्याची शक्यता आहे. हे पाहता, पोलिसांनी भाविकांच्यावर डुबक्यांवर निर्बंध आणले आहे. पोलिस महानिरीक्षक संजय गुंज्याल यांनी याबाबत सांगितले की, पोलिस माहिती केंद्रावरून भाविकांना ३ डुबक्या लावण्याबाबतची सूचना वारंवार केली जाईल. हरकी पैडीसह इतर गर्दी होणाऱ्या घाटांवरही हीच व्यवस्था लागू केली जाईल.

गर्दी पांगवण्यासाठी यंत्रणा सज्ज
गर्दी पांगवण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज करण्यात आली असून पोलिस यावर नजर ठेवून राहणार आहेत. गंगा नदी पात्रात स्नान करणाऱ्या भाविकांना तीन डुबक्या मारून बाहेर पडावे लागेल. या भागात पोलिस कर्मचारी भाविकांना याप्रकारच्या सूचनाही देणार आहेत. कुंभमेळ्यात भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्तराखंड दहशतवादविरोधी पथक, प्रादेशिक सशस्त्र पोलीस व केंद्रीय निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, पाच बॉम्ब शोधक पथकेही हरिद्वारमध्ये तैनात केली आहेत. बिनतारी दळणवळण यंत्रणेबरोबरच संपूर्ण कुंभमेळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई
कुंभमेळ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. कुंभमेळ्यादरम्यान नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर, कुंभमेळ्याच्या पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९७४ जणांवर कारवाई केल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. उल्लेखनीय आहे की, १२ वर्षांनी होणारा कुंभमेळ्याचे देशभरातील भाविकांना आकर्षण असते. मात्र, यंदा कोरोनामुळे साडेतीन महिन्यांऐवजी ४८ दिवसच कुंभमेळा होईल. त्यामुळे  २७ एप्रिलला कुंभमेळ्याची सांगता होईल.