टीबी, दमा, कॅन्सरसारख्या आजारांपासून होणार बचाव

देशभरात वीज उत्पादनात गुंतलेल्या थर्मल पॉवर (Thermal Power) प्लान्टमधून (Plant) निघणारी राख पर्यावरणात विष पसरविण्याबरोबरच आजूबाजूच्या लोकांमध्ये टीबी, दमा, फुफ्फुसाचे संक्रमण व कॅन्सरसारखे आजारही पसरवित आहेत.

दिल्ली : देशभरात वीज उत्पादनात गुंतलेल्या थर्मल पॉवर (Thermal Power) प्लान्टमधून (Plant) निघणारी राख पर्यावरणात विष पसरविण्याबरोबरच आजूबाजूच्या लोकांमध्ये टीबी, दमा, फुफ्फुसाचे संक्रमण व कॅन्सरसारखे (TB, asthma, cancer) आजारही पसरवित आहेत. यापासून सुटका होण्यासाठी पॉवर प्लान्टच्या ३०० किलोमीटर अंतरापर्यंत पूल, राष्ट्रीय महामार्ग बनविण्यासाठी राखेचा उपयोग करण्यात येणार आहे. रस्ता निर्मितीमध्ये माती व दगडापेक्षा राख हा चांगला पर्याय सिद्ध होईल. यामुळे नैसर्गिक साधनसामुग्रीचे कमी नुकसान होईल.

सर्व राज्यांना पत्र
रस्ता परिवहन व महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्यांच्या प्रमुख सचिवांना, एनएचएआय, एनएचएआयडीसीएल, पीडब्ल्युडीचे चीफ इंजिनीअर्स, बीआरओला पत्र लिहिले आहे. यात पर्यावरण मंत्रालयाकडून नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेचा उल्लेख करत म्हटले आहे की, देशभरात ४० पेक्षा अधिक थर्मल पॉवर प्लान्टमधून दरवर्षी निघणारी कोट्यवधी टन राख गंभीर समस्या बनली आहे.

अनिवार्यपणे उपयोग
मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पॉवर प्लान्ट प्रशासन १०० टक्के राखेचा निपटारा करू शकत नाही. यामुळे माती, भूजल, नदी, हवेत राख मिसळल्यामुळे पर्यावरणाला नुकसान होत आहे. यासाठी थर्मल पॉवर प्लान्टमधून निघणारी राखेचा उपयोग ३०० किलोमीटरपर्यंतच्या अंतरात पूल, तटबंध व राष्ट्रीय महामार्ग निर्मितीमध्ये अनिवार्यपणे करण्यात येणार आहे.

असा विभागला जाणार खर्च
निर्मितीमध्ये राखेचे प्रमाण इंडिया रोड काँग्रेसने आधीच निश्चित केले आहे. रस्तेनिर्मितीमध्ये माती व दगडाच्या तुलनेत राख हा चांगला पर्याय आहे. यात परिवहनावर होणारा ५० टक्के खर्च पॉवर प्लान्ट उचलणार आहे व उरलेला ५० टक्के खर्च निर्माण कंपनी-ठेकेदाराला उचलावा लागणार आहे.

६३ % वीजनिर्मिती थर्मल प्लान्टद्वारे
सरकारी आकडेवारीनुसार, भारतात एकूण वीज उत्पादनाच्या सुमारे ६३ % विजेची गरज थर्मल पॉवर प्लान्टद्वारे पूर्ण होते. २०१६-१७मध्ये देशभरातील थर्मल पॉवर प्लान्टद्वारे विजेच्या उत्पादनामुळे १६९.१०मिलियन टन राख निर्माण झाली. २०१८-१९ मध्ये हा आकडा वाढून २१७.०४ मिलियन टन झाला. यात प्लान्टकडून ३७ ते ४० टक्के राखेचा निपटारा होऊ शकत नाही. काही प्लान्टची स्थिती आणखी खराब आहे. केंद्र सरकारने १०० टक्के राखेचा निपटारा करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहे. थर्मल पॉवर प्लान्टद्वारे निघणाऱ्या राखेत धोकादायक-विषारी आर्सेनिक, सिलका, अॅल्युमिनियम, पारा, आर्यनसारखे तत्त्व असतात. यामुळे प्लान्टच्या आजूबाजूच्या लोकांना घातक-जीवघेणे आजार होतात. भूमी, भूजल, नदीचे पाणीही यामुळे प्रदूषित होते.