पंतप्रधान चीनचे नाव घ्यायला घाबरत आहेत का ?

 आज स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी चीन आणि पाकिस्तानचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये मोदींनी चीनचे नाव का टाळले, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

सुरजेवाला म्हणाले की, सगळ्या भारतीयांनी या स्वातंत्र्यदिनी देशाच्या रक्षणासाठी आणि भारतीय हद्दीत घुसणाऱ्या चीनच्या सैन्याला परतवून लावण्यासाठी सरकार काय करत आहे , असा प्रश्न विचारला पाहिजे. भाषणात पंतप्रधानांनी एलओसी ते एलएसीपर्यंत देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्यांना भारतीय सैनिकांनी योग्य उत्तर दिल्याचे सांगितले. मात्र त्यांनी चीनचे नाव घेतले नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आणि १३० कोटी भारतीयांना सैन्यदलाचा अभिमान आहे. भारतीय सैन्यावर सगळ्यांचा विश्वास आहे. चीनला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैनिकांना आम्ही नमन करतो. पण जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांचे काय? ते चीनचे नाव घ्यायला का घाबरत आहेत?, असा प्रश्न सुरजेवाला यांनी विचारला आहे.

चिनी सैनिकांनी जेव्हा आपल्या हद्दीमध्ये घुसखोरी केली तेव्हा देशाचे संरक्षण करण्यासाठी सरकारने काय केले, असा प्रश्न स्वातंत्र्यदिनी विचारायला हवा. आपले सरकार लोकांची मते जाणून घेते का ?, आपल्या सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे का? आपल्याला बोलण्याचे प्रवास करण्याचे, विचार करण्याचे स्वांतत्र्य आहे का? असे प्रश्नही सुरजेवाला यांनी विचारले आहेत.