पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक पर्वामध्ये ७ सप्टेंबरला शिक्षक आणि विद्यार्थ्यांना करणार संबोधित,नव्या उपक्रमांचीही होणार सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा होणाऱ्या शिक्षा पर्वामध्ये ७ सप्टेंबर रोजी मार्गदर्शन करणार आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा होणाऱ्या शिक्षा पर्वामध्ये ७ सप्टेंबर रोजी मार्गदर्शन करणार आहेत. (Narendra Modi To Guide Teachers And Students) शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांशी ते बोलणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी पाच उपक्रमांचाही शुभारंभ करतील. दहा हजार शब्दांचा भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोश, दृष्टिहीनांसाठी ऑडिओ बुक्स, सीबीएसईची शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि मान्यता फ्रेमवर्क (एसक्यूएएएफ), स्किल इंड्यासाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम असे हे ५ उपक्रम सुरु होणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील स्वयंसेवक आणि देणगीदार आणि सीएसआर देणाऱ्यांसाठी विद्यांजली पोर्टल सुरु करणार आहेत.

    शिक्षण मंत्रालय शिक्षकांचे अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि नवीन शिक्षण धोरण २०२० पुढे नेण्यासाठी ४ ते १७ सप्टेंबर पर्यंत शिक्षक पर्व साजरा करत आहे. कोरोनामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे वेबिनारद्वारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करतील.२०२१ साठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त ४४ शिक्षकांच्या कार्यावरील माहितीपट देखील सादर करणार आहेत.

    शिक्षकांचे राष्ट्रीय पुरस्कार प्रथम १९५८ मध्ये सुरु करण्यात आले होते. तरुणांचे भविष्य घडवण्यात शिक्षकांच्या बांधिलकीचा सन्मान म्हणून हा पुरस्कार देण्यात येतो. १९६० च्या मध्यापासून माजी राष्ट्रपती आणि प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबरला पुरस्कार देण्यात येतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिक्षक, विद्यार्थी, पालकांना संबोधित करतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, सुभाष सरकार आणि राजकुमार रंजन सिंह देखील या कार्यक्रमात सहभागी होतील.

    राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२१ वितरण समारंभ ५सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद ४४ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करतील. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवडलेल्या शिक्षकांमध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, आसाम, आंध्र प्रदेश, सिक्कीम, तामिळनाडू, ओडिशा, गुजरात, बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी दोन शिक्षक आहेत. या वर्षी पुरस्कारप्राप्तांमध्ये नऊ महिलांचा समावेश आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमधील दोन शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. दिल्लीतील द्वारका येथील बालभारती पब्लिक स्कूल आणि राजस्थानमधील बिर्ला बालिका विद्यापीठ, झुंझुनू येथील शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल, करपवंद, बस्तर, छत्तीसगडमधील एका शिक्षकाला देखील राष्ट्रीय शिक्षक पुरस्करानं सन्मानित केलं जाणार आहे.