दोन हजार रूपयांच्या नोटेची छपाई वर्षभरापासून बंद

दोन हजारांच्या नोटांचा चलनातील वापर देखील कमी झालेला दिसत आहे. रिझर्व्ह बँकेच्या २०१९-२० च्या वार्षिक अहवालातून ही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकने ( Reserve Bank of India )  २०१९-२० मध्ये दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांची छपाई केलेली नाही. तसेच दोन हजारांच्या ( Two thousand ) नोटांचा चलनातील वापर देखील कमी झालेला दिसत आहे. रिझर्व्ह बँकेच्या २०१९-२० च्या वार्षिक अहवालातून ही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

२०१८ साली बाजारातील एकूण नोटांमध्ये दोन हजारच्या नोटांचे प्रमाण ३.३ टक्के म्हणजे ३३ हजार ६३२ लाख इतके होते. तर मार्च, २०१९ च्या अखेरपर्यंत त्यात घट होऊन ३२,९१० लाखांवर गेली आणि मार्च २०२० च्या अखेरीस तर चलनात असलेल्या या नोटांची संख्या आणखी कमी होत २७,३९८ लाखांवर गेली.

सर्वसामान्य ग्राहकांकडून दोन हजारांच्या नोटांची मागणी घटली असून दोन हजारांच्या नोटांचे सुट्टे सहज मिळत नसल्यामुळे ग्राहकांनी ५००, २०० आणि १०० रूपयांच्या नोटांना पसंती दर्शवली आहे. त्यामुळे दोन हजारच्या नोटांची मागणी कमी झाली आहे. दोन हजारच्या नोटा बाजारातून कमी होत असताना २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण वाढले आहे.