कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; भाजपकडून नितीश सरकारची कोंडी

डॉ. संजय जायसवाल यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शुक्रवारी सकाळी बेतिया ते पाटणा प्रवासाचा उल्लेख करीत कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले. बेतिया ते पाटण्यादरम्यान पूर्व चंपारणच्या सेमरामध्ये जनतेने चक्का जाम केला होता.

पाटणा. बिहारमधील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जायसवाल यांनी आपल्याच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारची कोंडी केली आहे. जायसावल यांनी पूर्व चंपारण जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवरून नितीश सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या समस्येवरून भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून आपल्याच सरकारची कोंडी करण्यात आल्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीतच लागले आहे.

डॉ. संजय जायसवाल यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शुक्रवारी सकाळी बेतिया ते पाटणा प्रवासाचा उल्लेख करीत कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले. बेतिया ते पाटण्यादरम्यान पूर्व चंपारणच्या सेमरामध्ये जनतेने चक्का जाम केला होता. याबाबतची माहिती जाणून घेतली असता, तेथे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याचे लक्षात आले. आज गावकऱ्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते दुचाकी सोडून तेथून पसार झाले.

ग्रामस्थांनी तुरकोलिया पोलिस स्टेशनच्या प्रभारींना फोन केला असता, त्यांनी उलट गावकऱ्यांनाच धमकावले. पोलिस गावात आली तर तुम्हालाच अटक करेल, अशी धमकी त्यांनी ग्रामस्थांना दिली. यावरून पूर्व चंपारणमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे दिसून येत आहे, अशी खंत जायसवाल यांनी व्यक्त केली. दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षानेच कायदा-सुव्यवस्थेबाबत सरकारवर टीका केल्यामुळे विरोधकांचेही चांगलेच फावले आहे.