शायर राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण

देशात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. सर्व सामान्यांपासून ते सेलिब्रिटी पर्यंत सगळेजण या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

देशात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. सर्व सामान्यांपासून ते सेलिब्रिटी पर्यंत सगळेजण या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आता प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांना देखील करोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. राहत इंदौरी यांचे पुत्र सतलज यांनी याबाबत माहिती दिली, नंतर स्वत: इंदौरी यांनीही याबद्दल ट्वीट केले.

“कोविडची सुरुवातीची लक्षणं आढळून आल्याने मी काल तपासणी करून घेतली, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अरविंदो रुग्णालयात मी उपचार घेत आहे. प्रार्थना करा की लवकरात लवकर मला या आजाराला हरवता येईल. आणखी एक विनंती आहे, कृपया कोणीही मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करू नये, माझ्या प्रकृतीबाबतची माहिती आपल्याला ट्विटर व फेसबुकद्वारे मिळत राहील.” अशा आशयाचा संदेश त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून फॅन्सना दिला आहे. 

राहत इंदौरी यांना इंदौरच्या अरविंदो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. राहत इंदौरी यांची प्रकृती स्थिर असून धोक्याच्या बाहेर आहे, अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली. इंदौरी यांचे वय ७० वर्षे असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.