‘परीक्षा पे चर्चा’ऐवजी खिलौने पे चर्चा, राहुल गांधींची टीका

JEE-NEET चे उमेदवार पंतप्रधान मोदींकडून 'परीक्षा पर चर्चा' करण्याची अपेक्षा लावून बसले होते, मात्र मोदींनी 'खिलौने पे चर्चा' केली', असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज रविवारी ‘मन की बात’मधून ( Mann Ki Baat) जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी स्वदेशी खेळण्यावरही चर्चा केली. त्यानंतर जेईई आणि नीट (JEE-NEET) परीक्षा देणारे विद्यार्थी ‘परीक्षा पे’ चर्चा करण्यासाठी उत्सुक असताना पंतप्रधान मात्र ‘खिलौने पे’ चर्चा करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे.

JEE-NEET चे उमेदवार पंतप्रधान मोदींकडून ‘परीक्षा पर चर्चा’ करण्याची अपेक्षा लावून बसले होते, मात्र मोदींनी ‘खिलौने पे चर्चा’ केली’, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. कोरोना संकटकाळात JEE-NEET परीक्षा घेण्यास राहुल गांधी विरोध करत आहेत. तसेच कोरोनामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, ‘मन की बात’ ऐकल्यानंतर लहान मुलं नवं-नवीन खेळण्याची मागणी करतील यासाठी मी आई-वडिलांची क्षमा मागतो, असे मोदी म्हणाले. खेळणी आपली महत्त्वाकांक्षा वाढवण्यासाठी मदत करतात तर खेळणे आपल्या आकंक्षांना देखील पंख देतात. आपल्या देशात स्थानिक खेळण्यांची एक समृद्ध परंपरा आहे. तसेच आपल्या देशात प्रतिभाशाली आणि कुशल कारागीर आहेत, ज्यांना चांगली खेळणी बनविण्यात खास कौशल्य प्राप्त आहे.