विमा सुधारणा विधेयक पारित, राज्यसभेकडून ७४ टक्के परकीय गुंतवणुकीसाठी मंजुरी

विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीची(foreign direct investment in insurance sector) कमाल मर्यादा ७४ टक्के इतकी निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ ही अनिवार्य अट नाही किंवा अचानक कंपन्यांकडे इतकी गुंतवणूकही येईल, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

  दिल्ली: देशाचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांनी विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक ७४ टक्के करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आता देशातील विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक ही ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के करणारे विमा सुधारणा विधेयक २०२१ हे राज्यसभेत पारित करण्यात आले. यावर संसदेत झालेल्या चर्चेनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याच्याशी निगडीत समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.

  देशात गुंतवला जाणार पैसा
  विमा क्षेत्रातील प्रिमिअमच्या माध्यमातून मिळणाऱ्या रक्कमेसंदर्भात विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी देशातील विमा क्षेत्र हे सर्वाधिक रेग्युलेटेड क्षेत्र असल्याचे म्हटले. तसेच विमा उत्पादनपासून त्यातील उत्पादन, गुंतवणूक त्याचे मार्केटिंग हे सर्व नियामक ठरवत असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच सरकारने विमा क्षेत्रातून येणारा पैसा हा देशातच गुंतवला जाईल याची कायद्यात तरतूद केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  नरसिंह राव व मनमोहन सिंग यांना श्रेय
  विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीची कमाल मर्यादा ७४ टक्के इतकी निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ ही अनिवार्य अट नाही किंवा अचानक कंपन्यांकडे इतकी गुंतवणूकही येईल, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले. कंपन्या आपल्या गरजेनुसार निर्णय करू शकतील. जर त्यांना पैशांची आवश्यकता असेल तर आम्ही त्यांना का रोखावे? असा सवालही त्यांनी केला. १९९१ मध्ये देशाची अर्थव्यवस्था खुली करण्याचा फायदा झाला. याचा लाभ आपण सर्वच जण घेत आहोत. यासाठी पी.व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांना त्याचे श्रेय दिले गेले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

  माल्या, मोदी, चोक्सीला आणणार परत
  विमा क्षेत्राचा विस्तार होत आहे त्यांना निधीची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारतवरही भाष्य केले. थेट परकीय गुंतवणूकीतून मिळणारा पैसा याच ठिकाणी गुंतवला जाईल. इथे या पैसा कमवा आणि पळून जा असे आम्ही म्हणत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी एका खासदारानं विजय माल्याचे नावदेखील घेतले. यावर निर्मला सीतारामन यांनी पलटवार करत विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी या सर्वांना आपण परत आणतोय आणि ही आत्मनिर्भरता आहे. त्यांना देशाच्या कायद्याचा सामना करावा लागणार असल्याचेही सीतारामन यांनी सांगितले.

  दरम्यान, ही गुंतवणूक ७४ टक्के करताना नियामन इरडाशी आपण विस्तृत चर्चा केल्याचेही त्या म्हणाल्या. थेट परकीय गुंतवणूकीचे ध्येय हे लाईफ इन्शुरन्स अनेकांपर्यंत पोहोचवणे हे असल्याचेही त्यांनी नमूद केले.