no instructions give notice sharad pawar election commission clears

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या रंणागणात उतरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे बिहार विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय राकाँने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलासोबत एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. आम्ही जास्त जागांसाठी आग्रहीदेखील नव्हतो पण एकत्र लढण्याची काँग्रेसची मानसिकता दिसली नाही. त्यामुळे आता स्वबळावर ही निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असे प्रफुल पटेल यांनी नमूद केले. इतर पक्षांना महत्त्व न देणे, ही काँग्रेसची भूमिका दुर्दैवी असल्याची खंत पटेल यांनी यावेळी व्यक्त केली.
बॉक्स

शिवसेनेसोबत चर्चा झालेली नाही
बिहारमध्ये आम्ही या निवडणुकीत महाआघाडीचा भाग नसणार आहोत. आम्हाला या आघाडीत स्थान दिले गेले नसल्याने आम्ही स्वतंत्र लढणार आहोत, असे पटेल यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शिवसेनेबद्दल विचारलेल्या प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली. बिहारमध्ये एकत्र लढण्याबाबत शिवसेनेसोबत आमची कोणतीही चर्चा झालेली नाही, असे ते म्हणाले. पक्षाने बिहारमध्ये स्वबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्यानुसार आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

 


भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही

राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेनेदेखील बिहारमधील निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या तयारीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी भाष्य केले. यावेळी बिहारमध्ये भाजपला रोखण्यासाठी शिवसेना प्रयत्न करीत आहे का?, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर बिहारमध्ये भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही, अशी प्रांजळ कबुली संजय राऊत यांनी दिली. बिहार निवडणुकीबद्दल कोणताही फॉर्म्युला अद्याप तयार झालेला नाही. तेथील काही लहान पक्षांना शिवसेनेसोबत काम करायचे आहे. यातील काही पक्ष जिल्हा स्तरावरचे आहेत. पप्पू यादव यांच्या पक्षाने शिवसेनेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे राऊत यांनी सांगितले. शिवसेना बिहारमध्ये 40 ते 50 जागा लढवेल. मात्र अद्याप तरी युतीबद्दल कोणाशीही चर्चा झालेली नाही. मी पुढील आठवड्यात पाटण्याला जाणार आहे. तेव्हा तेथील स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे राऊत म्हणाले.
बॉक्स

अखेर मिळाला तुतारी वाजविणारा मावळा
पुढील महिन्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किट हे चिन्ह दिले होते. मात्र, हे चिन्ह बदलून देण्याची लेखी मागणी बिहारमधील शिवसेनेकडून आयोगास करण्यात आली होती. त्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने शिवसेनेची मागणी मान्य करत शिवसेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्ह दिले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किटाऐवजी तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्ह बदलून दिल्याचे सोमवारी कळवले. यानंतर निवडणूक आयोगाने बदलून दिलेल्या या नव्या चिन्हाला शिवसेनेची पसंती असल्याचे सांगण्यात येत आहे.