रावसाहेब दानवे, संजय धोत्रेंचा राजीनामा?, दिल्लीत घडामोडींना वेग

मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आता काही मंत्र्यांचे राजीनामे मागितले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अकोल्याचे खासदार संजय धोत्रेंचाही समावेश आहे. याचबरोबर माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडेदेखील राजीनामा मागितल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते तातडीने दिल्लीला निघाले आहेत.

  नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आता काही मंत्र्यांचे राजीनामे मागितले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह पाच ते सहा मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अकोल्याचे खासदार संजय धोत्रेंचाही समावेश आहे. याचबरोबर माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडेदेखील राजीनामा मागितल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते तातडीने दिल्लीला निघाले आहेत.

  संजय धोत्रे यांच्याकडे केंद्रीय शिक्षण, संचार तसेच इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रसार राज्य मंत्रीचा पदभार होता. तर रावसाहेब दानवे यांच्याकडे गाहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा राज्य मंत्री पद आहे. रमेश पोखरियाल निशंक यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात आले आहे.

  तर दुसरे मंत्री पश्चिम बंगालमधील खासदार देबोश्री चौधरी यांच्याकडे देखील राजीनामा मागण्यात आला आहे. त्यांच्या जागी पश्चिम बंगालच्याच नेत्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या दोघांनंतर केंद्रीय मंत्री सदानंद गौड़ा यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटकमधील राजकीय घडामोडींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर राज्य मंत्री संतोष गंगवार यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जोशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जोशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डॉ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात आले. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह सुशील मोदी, वरुण गांधी, भूपेंद्र यादव, दिलीप घोष या भाजप नेत्यांना तसेच लल्लन सिंग (जेडीयू), पशुपती पारस (एलजेपी), अनुप्रिया पटेल (अपना दल), चंद्र प्रकाश (एजेएसयू) यांना सामावून घेण्याचा भाजप पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न राहणार आहे. दरम्यान, नारायण राणे, प्रीतम मुंडे, कपिल पाटील दिल्लीत पोहचले आहेत. डॉ, भागवत कराड दिल्लीमध्ये आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अल्पसंख्याकांनाही सामावून घेण्यात येऊ शकते.

  एका मंत्र्याला कालच दिले राज्यपालपद

  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधीच विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत यांना मंत्रिपदावरून हटवून कर्नाटक राज्याचे राज्यपाल बनविण्यात आले. आहे.