चित्रकूटमध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या बैठकीत मास्टर प्लॅन, धर्म, संस्कृती आणि राजकारणावर चिंतन

या बैठकीबाबत अत्यंत गोपनियता बाळगण्यात येत असून, या परिसरातील ३ किलोमीटर अंतरावर बॅरेकेटिंग करण्यात आले आहे. तसंच पाच जिल्ह्यांतील पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. या बैठकीत प्रत्यक्षात आणि व्हर्चुअली सहभागी होणाऱ्यांना बैठकीतील विषयांबाबत बाहेर काही बोलू नये, असे आदेशही देण्यात आले आहेत.

  चित्रकुट : देशात चर्चेत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम चित्रकूटमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत सुरु असल्याची माहिती आहे. धर्म, संस्कृती आणि राजकारण या तिन्ही विषयांवर इथे विचारमंथन सुरु असून, संघाचे पदाधिकारी कित्येक तास या मुद्द्यांवर चर्चा करीत आहेत. चित्रकूट येथे दीनदयाल उपाध्याय सिसर्च फाऊंडेशनमध्ये ही महत्त्वाची बैठक सुरु आहे.

  या बैठकीबाबत अत्यंत गोपनियता बाळगण्यात येत असून, या परिसरातील ३ किलोमीटर अंतरावर बॅरेकेटिंग करण्यात आले आहे. तसंच पाच जिल्ह्यांतील पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. या बैठकीत प्रत्यक्षात आणि व्हर्चुअली सहभागी होणाऱ्यांना बैठकीतील विषयांबाबत बाहेर काही बोलू नये, असे आदेशही देण्यात आले आहेत.

  संघासमोरील असलेली आव्हाने आणि देशातील सद्यस्थिती याबाबत या बैठकीत चर्चा सुरु आहे.

  संघासमोरचे चार महत्त्वाचे प्रश्न

  १. संघाने आपली प्रतिमा धर्मनिरपेक्ष करावी का?
  २. संघाने प्रतिमा धर्मनिरपेक्ष केल्यास देशात आणि राज्यात भाजपाचे सरकार येण्यास मदत होईल का ?
  ३. संघाची धर्मनिरपेक्ष प्रतिमा संघाच्या पारंपरिक अनुयायांना आणि मतदारांना भावेल का ?
  ४. जर देशात कोरोनाची तिसरी लाट आली तर संघ या लाटेत कोणती सेवाकार्य करेल

  पाच मुद्द्यांवर विचारविनिमयानंतर, सरकारसाठी ठरणार धोरण

  १. धर्मांतरण विरोधी केंद्रीय कायद्याबाबत एकमत :

  धर्मांतरण रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कायदा लागू करण्याबाबत बैठकीत सगळ्यांचे एकमत आहे. धर्मांतरणाच्या विरोधात कायदा लागू व्हावा, यासाठी संघाकडून मोदी सरकारपुढे प्रस्ताव ठेवला जाईल, अशी चर्चा आहे. घर्मांतरण घडविणाऱ्यांना कठोर शिक्षेचीतरतूद व्हावी, अशीही मागणी करण्यात येते आहे. २०२४च्या जाहीरनाम्यात या मुद्द्याचा समावेश करुन, हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा करावा, की निवडणुकांपूर्वी हा कायदा लागू करुन, याचा वापर निवडणुकांसाठी करावा, याबाबत द्विधा स्थिती असल्याची माहिती आहे.

  २. धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा आणि घरवापसी :

  धर्मांतरण रोखण्यासाठी कायद्याबाबत चर्चा झाल्याची, तसेच कायदेशीर रित्या शिक्षेच्या तरतुदीबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. कारवाईची पद्धत कशी असावी, याही विषयावर चर्चा झाली आहे. मुस्लिमांमधील मोठा समुदाय हा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करु इच्छितो, असे संघाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. यासाठी जबरदस्ती करण्याची गरज नाही. त्यामुळे आगामी काळात धर्मांतराची दिशा, हिंदूच्या बाजूने होतेय, अशी प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे.

  ३. लोकसंख्या नियंत्रण कायदा :

  देशातील वाढती मुसलमानांची संख्या हा संघासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा लवकरात लवकर लागू व्हावा, यासाठी रणनीती आखण्यात येते आहे.

  ४. योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न :

  उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी संघाची योजना तयार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ब्लॉक प्रमुख पदासांठी होणाऱ्या निवडणुकीत संघाचाच फॉर्म्युला चालवण्यात येत असल्याची माहिती आहे. अनेक आमदारांचे तिकिट कापले जाण्याची शक्यता आहे. त्यातील अनेकांच्या बायकांना आणि नीकटवर्तीयांना ब्लॉक प्रमुख निवडणुकीत तिकिटे देवून त्यांना शांत ठेवण्याचे प्रयत्न केले जातील. अगदी तिकिट वाटपापासून ते योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा उजळावी, यासाठी संघाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी संघ मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

  ५. कोरोनाची तिसरी लाट :

  कोरोनाची तिसरी लाट आलीच, तर त्यात समाजकार्यासाठी संघाने तयारी केली आहे. अशा परिस्थितीत संघ सक्रिय दिसेल. क्षेत्र प्रचारक आणि प्रांत प्रचारकांकडून तिसऱ्या लाटेच्या तयारीची योजना मागण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेत संघ कार्यकर्ते प्रत्यक्ष रमभूमीत का दिसले नाहीत, ही विचारणा करण्यात आली आहे. तसेच संघाच्या सेवा कार्यांची दुसऱ्या लाटेत चर्चा का झाली नाही, असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेत संघाने प्रत्यक्ष सेवा कार्यात उतरावं आणि त्याची चर्चा व्हावी, असे सांगण्यात आले आहे. गावागावात जाऊन स्थानिकांना याबाबत जागरुक करण्याचे आणि आवश्यकतेनुसार मदत करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे, मात्र त्याची योजना अजून पूर्ण झालेली नाही.

  प्रतिमेबाबत द्विधा, शाखा अनलॉक करण्याचा विचार

  कोरोना काळात बंद पडलेल्या शाखा आता परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, याचीही चर्चा सुरु आहे. पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता बंद पडलेल्य़ा शाखा हा चिंतेचा विषय ठरणारा आहे. त्यामुळे कोरोना प्रोटोकॉलसह शाखा सुरु करण्यावर आगामी काळात भर दिला जाण्याची शक्यता आहे. संघाचे शताब्दी वर्षही २०२५ साली असल्याने कार्याचा मोठा विस्तार करण्याची योजनाही आखण्यात येत आहे.

  पाच दिवसांच्या या बैठकीत ५० ते ५५ जणांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला तर २५० जण व्हर्चुअली या बैठकीत सहभागी झाले. ९ आणि १० जुलैला ११ क्षेत्र प्रचारकांची बैठक पार पडली. तर १२ जुलैला ४५ प्रांतांतील प्रांत प्रचारक आणि सहप्रांत प्रचारकांची बैठक पार पडली.

  Rashtriya Swayamsevak Sangh meeting in Chitrakoot reflects on master plan religion culture and politics