संयुक्त राष्ट्रातही उमटले पडसाद; शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार-  स्टेफने डुजारिक यांचे मत

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस एंटानियो गुटेरस यांच्या प्रवक्त्योनही शेतकऱ्यांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार असून त्यांना त्या अधिकारानुसार आंदोलन करू दिले जावे असे मत व्यक्त केले.

 

संयुक्त राष्ट्: केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाची चर्चा कॅनडा, ब्रिटनपाठोपाठ आता संयुक्त राष्ट्रातही (UN)होऊ लागली आहे. भारताने हा देशांतर्गत प्रश्न असल्याचे सांगत विदेशी नेत्यांनी हस्तक्षेप करू नये असे बजावले असतानाच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो(Justin Trudeau) यांनी पुन्हा आपले मत व्यक्त केले तर दुसरीकडे, ब्रिटनमधील काही खासदारांनी सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली. आता संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस एंटानियो गुटेरस यांच्या प्रवक्त्योनही शेतकऱ्यांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार असून त्यांना त्या अधिकारानुसार आंदोलन करू दिले जावे असे मत व्यक्त केले.

द्विपक्षीय संबंधांना जाणार तडे
संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टेफने डुजारिक(Stéphane Dujarric) यांना भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रश्न विचारण्यात आला असता, ‘ जनतेला शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि सरकारने त्यांना आंदोलन करू द्यावे’ असे ते म्हणाले. उल्लेखनीय असे की यापूर्वी कॅनडाच्या पंतप्रधानांनी आंदोलनात हस्तक्षेप करताच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आक्षेप नोंदविला होता तथापि कॅनडा पीएम कॅबिनेटचे काही मंत्री व खसादारांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केले आहे. यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अशा प्रकारामुळे द्विपक्षीय संबंधांना तडे जाणार असल्याचा इशारा दिला आहे. विदेशी नेत्यांचा भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप अमान्य असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

मोदी सरकारसोबत चर्चा करा -३६ ब्रिटिश खासदारांची मागणी

देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता विदेशातूनही पाठिंबा मिळू लागला आहे. देश आणि जगातील शीख व पंजाबी शेतकऱ्यांनीही या आंदोलनास समर्थन दिले आहे. यापूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही भाष्य केले होते आता ब्रिटनमधील काही खासदारांनी ब्रिटन सरकारला भारत सरकरारसोबत या मुद्यावर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. ब्रिटनमधील मूल भारतीय व पंजाबशी संबंधित 36 खासदारांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. या खासदारांनी विदेश सचिव डॉमिनिक रॅब यांना पत्र लिहिले असून त्यात त्यांनी मोदी सरकारसोबत चर्चा करावी, असे आवाहन केले आहे. या पत्रावर जेरेमी कॉर्बिन, वीरेंद्र शर्मा, सीमा मल्होत्रा, वैलेरी वाज, नादिया व्हिटोम, पीटर बॉटमली, जॉन मैककॉलन, मार्टिन डॉकर्टी-ह्यूजेस आणि एलिसन थेवलिस यांची स्वाक्षरी आहे.