अहवाल : खरेदीचा बदलला ट्रेंड, ई-कॉमर्स बाजारात 27% उलाढाल 99 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचणार

भारत सरकार आणि रिझर्व्ह बँकेने लोकांना डिजिटल बँकिंगचा पर्याय दिला आणि आज देशभरात ऑनलाईन शॉपिंगचा एक ट्रेंड तयार झाला आहे. दिवसेंदिवस ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढत असून लहान कंपन्यांनीही ग्राहकांना ही सुविधा प्रदान केली आहे.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क,दिल्ली.

    कोरोना साथरोगाने संपूर्ण जगाला विळखा घातला असून आता लोकांच्या काम करण्याच्या पद्धती आणि राहणीमानातही अनेक बदल झाले आहेत. भारतातही प्रथमच बरेच बदल झालेले दिसत आहे. कोरोनाच्या दहशतीत अनेक लोकं आपल्या घरातून बाहेर पडण्यास धजावत नाही.

    त्यामुळेच भारत सरकार आणि रिझर्व्ह बँकेने लोकांना डिजिटल बँकिंगचा पर्याय दिला आणि आज देशभरात ऑनलाईन शॉपिंगचा एक ट्रेंड तयार झाला आहे. दिवसेंदिवस ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढत असून लहान कंपन्यांनीही ग्राहकांना ही सुविधा प्रदान केली आहे. 2019-2024 पर्यंत 27% वाढ अपेक्षित असून 2024 पर्यंत या व्यवसायात 99 अब्ज डॉलरपर्यंत उलाढाल होण्याची शक्यता आहे.

    2200 लाख ऑनलाईन शॉपर्स

    यासंदर्बात जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार किराणा आणि फॅशन बाजारात वाढ झाली आहे. 2025 पर्यंत भारतात 2200 लाख ऑनलाईन शॉपर्स असतील असा अंदाज असून किरकोळ बाजारात जवळपास 10 टक्के वाढ झाली आहे. 2019 मध्ये ही टक्केवारी 4.7% होती. भारतात ऑनलाईन रिटेल मार्केटमध्येही 25 टक्के वाढ अपेक्षिदत असून 2027 पर्यंत ही संख्या 37 टक्केपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.