बाबरी विध्वंसावर आज निकाल : अडवाणी, जोशींसह अनेकांचे भाग्य आज ठरणार

लखनौ : ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशिदीचा वादग्रस्त भाग उद्ध्वस्त केल्या प्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय आज बुधवार ३० सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करणार आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून जवळपास सर्वच आरोपींनी घटनेत हात नसल्याचा दावा केला आहे. यासोबतच त्यांच्यावरील आरोप राजकीय द्वेषापोटी लावण्यात आल्याचाही आरोप केला आहे. या प्रकरणात भाजपचे वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती व विनय कटियार यांच्यासह एकूण ४९ जण आरोपी आहेत.

लखनौ : ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशिदीचा वादग्रस्त भाग उद्ध्वस्त केल्या प्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय आज बुधवार ३० सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करणार आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून जवळपास सर्वच आरोपींनी घटनेत हात नसल्याचा दावा केला आहे. यासोबतच त्यांच्यावरील आरोप राजकीय द्वेषापोटी लावण्यात आल्याचाही आरोप केला आहे. या प्रकरणात भाजपचे वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती व विनय कटियार यांच्यासह एकूण ४९ जण आरोपी आहेत. त्यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणातील ५० साक्षीदारही हयात नाहीत. २८ वर्षांपूर्वी ६ डिसेंबर १९९२ रोजी ही घटना घडली होती.

देशभरात हायअलर्ट

सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.के. यादव ३२ आरोपींसमोर सकाळी १० वाजता निकाल देणार आहेत. २८ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतरच्या निकालाची संवेदनशीलती पाहू जाता अयोध्येसह देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

उपस्थितीपासून सूट

आरोपींच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांचे वयोमान पाहता न्यायालयाने त्यांना व्यक्तिश: उपस्थित राहण्यापासून सूट दिली आहे. ते व्हीडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून उपस्थित होतील. यावेळी त्यांच्या घराबाहेर पोलिस बंदबोस्तही असेल.
मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती, उप्रचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह आणि सथ्या ऑक्सिजनवर असलेले महंत नृत्य गोपाल दास न्यायालयात उपस्थित राहणार नाहीत.

सर्व आरोपींची मुक्तता करा- सत्येंद्र दास व इक्बाल अन्सारींचे आवाहन

कोर्टाचा निकाल येण्यापूर्वीच रामललाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास आणि मुस्लिम पक्षकार इक्बाल इन्सारी यांनी सर्व आरोपींची मुक्तता करण्याचे आवाहन केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवेळी तेथे कधी बाबरी मशिद होती हेच सिद्ध झाले नाही त्यामुळेच रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल लागला होता असा दावा करीत बाबरी विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता व्हावी असे मत व्यक्त केले.
दुसरीकडे, इक्बाल अन्सारी यांनी बाबरी मशीद विध्वंसासह मंदिर -मशिदीशी संबंधित सर्व खटले रद्द करण्यात यावे अशी मागणी केली. हिंदू-मुस्लिमांमध्ये कोणताही वाद नको असेही ते म्हणाले. तथापि काही मूठभर नेतेच हिंदू -मुस्लिम एकतेला तडा देण्याचे काम करतात असी टीकाही त्यांनी केली.

हाजी महबूब म्हणतात, दोषींना व्हावी शिक्षा

बाबरी मशिदीचे माजी पक्षकार हाजी महबूब यांनी बाबरी विध्वंस प्रकरणातील आरोपींना शिक्षा ठोठावण्याचे आवाहन कोर्टाला केले आहे. घटनेच्या दिवशी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि विनय कटियार घटनास्थळी उपस्थित होते असा दावाही त्यांनी केला. या सर्वांविरोधात पुरावे असून हजारो लाखो लोकांच्या उपस्थितीत मशिदीला शहीद करण्यात आले असे ते म्हणाले.