roche cipla antibody cocktail

रोशे इंडिया (Roche India) आणि सिप्ला यांनी सोमवारी भारतात रोशेची अँटिबॉडी कॉकटेल (Antibody Cocktail) लाँच करण्याची घोषणा केली. या औषधाचा वापर गंभीर रुग्णांसाठी करण्यात येणार आहे.

    नवी दिल्ली: भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र देशामध्ये लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिननंतर स्फुटनिक – व्ही या लसीचे लसीकरणही सुरु झाले आहे. दरम्यान, डीआरडीओने तयार केलेलं अँटिकोविड औषधही लाँच झालं आहे. आता सिप्लाने (Cipla) मोठी घोषणा केली आहे.  रोशे इंडिया (Roche India) आणि सिप्ला यांनी सोमवारी भारतात रोशेची अँटिबॉडी कॉकटेल (Antibody Cocktail) लाँच करण्याची घोषणा केली. या औषधाचा वापर गंभीर रुग्णांसाठी करण्यात येणार आहे.


    सिप्ला आणि रोशे यांनी सांगितलं की, अँटिबॉडी कॉकटेलची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. दुसरी खेप जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पोहोचेल. यामुळे जवळपास दोन लाख रुग्णांवर उपचार करता येणार आहेत. सिप्ला देशभरात हे अँटिबॉडी कॉकटेल वितरीत करणार आहे. अँटिबॉडी कॉकटेलच्या एका रुग्णासाठीच्या डोसची किंमत ५९ हजार ७५० रुपये इतकी आहे. सर्व करांसहीत ही किंमत असून अँटिबॉडी कॉकटेल प्रमुख रुग्णालये आणि कोरोना ट्रिटमेंट सेंटर्समधून औषध उपलब्ध होईल.

    मिळालेल्या माहितीनुसार, अँटिबॉडी कॉकटेलच्या औषधाचा एक डोस हा १२०० mg इतका आहे. यामध्ये Casirivimab आणि Imdevimab अशी दोन औषधे असणार असतील. तसेच एका डोसची किंमत ५९ हजार ७५० रुपये इतकी आहे. याशिवाय मल्टि डोस पॅकची किंमत १ लाख १९ हजार ५०० रुपये आहे. मल्टिडोस पॅकमध्ये दोन रुग्णांना डोस देता येतील. हा डोस १२ वर्षांवरील सर्वांसाठी आहे. ज्यांचे वजन किमान ४० किलो आहे आणि ज्यांचा आजार गंभीर आहे,त्यांना हा डोस देता येईल.