रुबैया सईद अपहरण प्रकरण यासिन मलिकला भोवले; जाणून घ्या काय होते प्रकरण!

एनआयएने २०१९ मध्ये दहशतवाद्यांना फंडिंग केल्याच्या आरोपात मलिकला अटक केली होती. या अटकेपूर्वीच केंद्र सरकारने मलिकच्या संघटनेवरही बंदी घातली होती.

  • यासिन मलिकविरोधात आरोप निश्चित

जम्मू. विशेष टाडा न्यायालयाने ३१ वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांची कन्या रुबैया सईद अपहरण प्रकरणात जम्मू काश्मिर लिबरेशन फ्रंटचे (जेकेएलएफ) प्रमुख मोहंमद यासीन मलिकसह नऊ जणांविरोधात आरोप निश्चित केले आहेत. मलिक सद्यस्थितीत तिहार कारागृहात आहे. एनआयएने २०१९ मध्ये दहशतवाद्यांना फंडिंग केल्याच्या आरोपात मलिकला अटक केली होती. या अटकेपूर्वीच केंद्र सरकारने मलिकच्या संघटनेवरही बंदी घातली होती. विशेष टाडा न्यायालयाने जोनवारी १९९० मध्ये श्रीनगर बाहेर भारतीय वायुदलाच्या चार जवानांच्या हत्येसंदर्भात मलिक व अन्य सहा जणांवर आरोप निश्चित केले होते.

अली मोहम्मद मीर, मोहम्मद जमान मीर, इकबाल अहमद गंदरू, जावेद अहमद मीर, मोहम्मद रफीक पहलू, मंजूर अहमद सोफी, वजाहत बशीर, मेहराजुद्दीन शेख आणि शौकत अहमद बख्शी यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. जेकेएलएफचा वरिष्ठ कमांडर मोहंमद रफीक डार आणि मुश्ताक अहमद याचा मृत्यू झाला असून अन्य १२ आरोपी फरार आहेत. जेकेएलएफ सदस्यांनी ८ डिसेंबर १९८९ रोजी श्रीनगरातून रुबैया सईदचे अपहरण केले होते.