पंतप्रधानांच्या हस्ते संसद टीव्ही चॅनेलचा होणार शुभारंभ, १५ सप्टेंबरला रंगणार खास लोकार्पण सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी संसद भवनात आयोजित कार्यक्रमात संसद टीव्ही (Sansad Tv Launching) वाहिनीचे औपचारिक उद्घाटन होणार आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी संसद भवनात आयोजित कार्यक्रमात संसद टीव्ही (Sansad Tv Launching) वाहिनीचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती वेकंय्या नायडू, लोकसभा स्पीकर ओम बिरला यांची उपस्थिती असणार आहे. संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज दाखवणाऱ्या लोकसभा टीव्ही(Loksabha TV) आणि राज्यसभा टीव्ही(Rajyasabha TV) या दोन्ही वाहिन्यांचं सरकारनं विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.

    लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही वाहिन्यांचं विलीनीकरण करून संसद टीव्ही अशी एकच वाहिनी आता असणार आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना, संसद टीव्हीची दोन चॅनेल असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जेणेकरून लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज त्यांच्यावर सतत प्रसारित करता येईल. सेवा निवृत्त सनदी अधिकारी रवि कपूर यांची संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    लोकसभेचं कामकाज दाखवण्यासाठी लोकसभा टीव्ही सुरू करण्यात आली होती. १९८९मध्ये ही वाहिनी सुरू करण्यात आली होती. काही काळानंतर राष्ट्रपतींचं अभिभाषण, लोकसभेतील प्रश्नोतरांचा तास, शून्यप्रहर यांचं थेट प्रक्षेपण सुरू करण्यात आलं. त्याचप्रमाणे लोकसभा टीव्ही या वाहिनीच्या धर्तीवर राज्यसभेचं कामकाज दाखवण्यासाठी राज्यसभा टीव्ही सुरू करण्यात आली. २०११मध्ये ही स्वतंत्र वाहिनी सुरू झाली.