काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना ईडीचा इंगा दाखवणारे वरिष्ठ अधिकारी राजेश्वर सिंह भाजपमधे प्रवेश करण्याची शक्यता

सिंह यांची उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख आहे. त्यांनी 2 जी स्पेक्ट्रम आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांचा समावेश असलेल्या एअरसेल-मॅक्सिस डीलसारख्या अनेक मोठ्या प्रकरणांची चौकशी केली आहे.

  कॉमनवेल्थ गेम्स, 2 जी स्पेक्ट्रम, एअरसेल-मॅक्सिस डील, कोळसा घोटाळा, अगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर डील, अशी हायप्रोफाइल प्रकरणे हाताळणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) वरिष्ठ अधिकारी राजेश्वर सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आहेत.

  इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, सिंह पुढच्या आठवड्यात भाजपमध्ये सामील होऊ शकतात. सध्या ते ईडीच्या लखनौ कार्यालयात तैनात आहेत. असे मानले जाते की उत्तर प्रदेश निवडणूका पाहता भाजप त्यांना पक्षात घेऊ शकते. तसे, हे एक अतिशय धक्कादायक पाऊल असेल कारण वर्ष 2018 मध्ये भाजप सरकारनेच राजेश्वर सिंह यांच्याविरोधात तपास सुरू केला आणि त्यांना दीर्घ सक्तिच्या रजेवर पाठवले होते.

  राजेश्वर सिंह यांची कारकिर्द

  यूपी केडर प्रांतीय पोलिस सेवा (पीपीएस) अधिकारी राजेश्वर सिंह यांचा कार्यकाळ वादग्रस्त आहे. तिथं ते राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणे हाताळण्यात अनेकवेळा वादात अडकले होते. त्यांनंतर त्यांना 2009 मध्ये ईडीला प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले.

  सिंह यांची उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख आहे. त्यांनी 2 जी स्पेक्ट्रम आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांचा समावेश असलेल्या एअरसेल-मॅक्सिस डीलसारख्या अनेक मोठ्या प्रकरणांची चौकशी केली आहे.

  हाय-प्रोफाइल केस हाताळतानाच सिंग यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली गेली होती. प्रतिवादात सिंग यांनी रजनीश कपूर नावाच्या याचिकाकर्त्याविरुद्ध मानहानीचा फौजदारी गुन्हा दाखल केला आणि सांगितले की त्यांनी तपासात अडथळा आणण्यासाठी जनहित याचिका दाखल केली आहे.

  सर्वोच्च न्यायालयाने वर्ष 2014 मध्ये राजेश्वर सिंह यांच्याविरोधातील याचिका फेटाळून लावली आणि त्यांना ईडीमध्ये उपसंचालक पदी नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, 27 जून 2018 रोजी न्यायालयाने त्यांची चौकशी करण्यासाठी सरकारला हिरवा कंदील दाखवला. आणि महसूल विभागाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तपास सुरू केला.

  पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) 10 एप्रिल 2018 रोजी अनिल गलगली नावाच्या मुंबईतील कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीच्या आधारावर, आयकर विभागात कार्यरत राजेश्वर सिंह आणि त्यांचा भाऊ रामेश्वर सिंह यांच्या बेहिशेबी मालमत्तेबद्दल चौकशीचे निर्देश दिले.

  असे हे रामेश्वर सिंह आता भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.