nirmala sitaraman

आयकर विभागाच्या नवीन पोर्टलवरील(Income Tax Portal) गोंधळांची यादी वाचताना थरुर(Tharur) यांनी सरकारने या पोर्टलच्या नुतनीकरणासाठी केलेला ४२०० कोटींचा खर्च पाण्यात गेला असल्याचं म्हटलं आहे.

  आयकर विभागाच्या नवीन पोर्टलवरील(Income Tax Portal) गोंधळावरुन काँग्रेसचे खासदार शशी थरुर(Shashi Tharoor Criticized Modi Government) यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. नवीन पोर्टल लॉन्च करण्यामागील कारणं नक्की काय आहेत असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.तसेच या नवीन पोर्टलवर फारच गोंधळ असल्याचं थरुर यांनी काही ट्विट करत म्हटलं आहे. पोर्टल लॉन्च करण्याची वेळ सुद्धा चुकीची असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. आयकर विभागाच्या नवीन पोर्टलवरील(Income Tax Portal) गोंधळांची यादी वाचताना थरुर यांनी सरकारने या पोर्टलच्या नुतनीकरणासाठी केलेला ४२०० कोटींचा खर्च पाण्यात गेला असल्याचं म्हटलं आहे.

  थरुर यांनी नव्या आयकर पोर्टलसंदर्भात पाच ट्विट केले आहेत.

  पहिल्या ट्विटमध्ये थरुर म्हणतात की, “ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसमधील चार्टड अकाऊटंटने मला दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागातच्या पोर्टलमध्ये करण्यात आलेले बदल हे फार त्रासदायक आहेत. त्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. लॉगइन करायलाही आधीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. नवीन पोर्टलमधील अनेक फिचर्सला पर्याय देण्यात आलेले नाहीत. यामध्ये आरटीआय फायलिंग, १५ सीए/सीबी फॉर्म्स आणि डेटा संदर्भातील माहिती मिळवताना अडचणी येत आहेत,”


  दुसऱ्या एका ट्विटमध्ये थरुर यांनी तीन प्रश्न सरकारला विचारले आहेत. मागील अनेक वर्षांपासून योग्य पद्धतीने काम करणारे आयकर विभागाचे पोर्टल बदलण्याची काय गरज होती?, असा पहिला प्रश्न थरुर यांनी तिसऱ्या ट्विटच्या सुरुवातील विचारला आहे. त्याचबरोबर सर्वाधिक करदाते ज्या कालावधीमध्ये आयकर भरतात त्या कालावधीमध्ये हा बदल का करण्यात आला ? नवीन पोर्टल लॉन्च करण्याआधी त्याची चाचणी का करण्यात आली नाही?, हे प्रश्नही थरुर यांनी उपस्थित केले आहे.


  चौथ्या ट्विटमध्ये थरुर यांनी नवीन पोर्टल हे अधिक युझर फ्रेण्डली, आधुनिक आणि न अडखळता काम करणारं हवं होतं असं मत व्यक्त केलं आहे. तसेच पुढे बोलताना, “या पोर्टलचं रिन्यूव्हेशन करण्यासाठी ४२०० कोटी रुपये खर्च करुनही सरकारला आपली ध्येय साध्य करता आली नाही उलट यामुळे गोंधळ निर्माण झालाय. जीएसटी पोर्टलप्रमाणे याचाही बोजवारा उडालाय,” असं थरुर म्हणाले आहेत.

  भारतामध्ये करदात्यांची संख्या फार कमी आहे. तसेच देशात करचोरी आणि काळ्यापैशासंदर्भातील अनेक गोंधळ आहे. भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच करदात्यांना कर भरायचा असूनही केवळ आयकर विभागाचा पोर्टल काम करत नसल्यामुळे त्यांना तो भरता येत नाही. हे पोर्टल लॉन्च करणाऱ्यांना दंड ठोठावला पाहिजे, असंही थरुर यांनी म्हटलं आहे.


  जून महिन्यामध्ये तब्बल ६ दिवस आयकर विभागाची करभरणा करण्यासंदर्भातली मुख्य वेबसाईट बंद ठेवण्यात आली होती. यासाठी नवीन वेबसाईट आणली जात असल्याचं आयकर विभागाकडून सांगण्यात आलं होतं. e-filing 2.0 असं या वेबसाईटचं नाव आहे. मात्र, मोठा गाजावाजा करून सोमवारी रात्री सुरू करण्यात आलेली ही वेबसाईट काही वेळातच क्रॅश होत असल्याच्या तक्रारी नेटिझन्सकडून करण्यात आल्या होत्या.

  ट्विटरवरच्या या तक्रारी पाहिल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विटरवरूनच या वेबसाईटवर काम करणाऱ्या इन्फोसिस आणि इन्फोसिसच्या सहसंस्थापक अध्यक्षांना म्हणजेच नंदन निलेकणी यांना सुनावलं होतं.