धक्कादायक ! महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराच्या घटनेत वाढ ; लॉकडाऊनमध्ये १४ हजारांहून अधिक गुन्हे दाखल

आपल्या देशात महिलांवरील अत्याचार नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे.सध्याचे हाथरस प्रकरण असो वा तेलंगणात अल्पवयीन मुलीला जाळण्याचा प्रयत्न असो.. देशात महिला अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहेत. पण, महिला सर्वाधिक शिकार ठरत आहेत त्या घरगुती हिंसाचाराच्या. जर आपण आकडेवारी पाहिली तर महिलांवरील गुन्हेगारीचे प्रत्येक तिसरे प्रकरण (एकूण प्रकरणांपैकी ३१ %) घरगुती हिंसाचाराशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.

एनसीआरबी म्हणजेच नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या गुन्हेगारी २०१९ च्या अहवालानुसार , २०१८ ते २०१९ पर्यंत महिलांवरील गुन्ह्यांमध्ये ३.३% वाढ झाली आहे. २०१९ मध्ये महिलांविरूद्ध गुन्हेगारीची ४,०५,८६१ प्रकरणे नोंदविण्यात आली, तर २०१८ मध्ये ३,७८,२३६ गुन्हे दाखल झाले. त्याचप्रमाणे एक लाख महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण २०१९ ला ६४.४% आहे, जे २०१८ मध्ये ५८.८ % होते.

-घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ

महिलांवरील एकूण अत्याचाराच्या घटनांपैकी बलात्काराच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत घट झाली आहे,मात्र घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. २०१८ मध्ये पती व नातेवाईकांच्या अत्याचाराशी संबंधित देशांतर्गत हिंसाचाराची एकूण प्रकरणे एक लाख चार हजार १६५ होती, जी २०१९ मध्ये वाढून एक लाख २६ हजार ५७५ झाली. म्हणजेच २१ % पर्यंत वाढ झाली आहे.

-न्यायालयांत सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे घरगुती हिंसाचाराची
एनसीआरबीच्या अहवालावरून, न्यायालयांत सर्वाधिक प्रकरणे ही घरगुती हिंसाचाराशी संबंधित आहेत . २०१८ मध्ये सुमारे दीड लाख प्रकरणांमध्ये पोलिसांचा तपास प्रलंबित होता, जो २०१९ मध्ये घट होऊन ५४ हजारांवर आला होता. तथापि, न्यायालयात खटले वाढत गेले. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये सुमारे ३० हजार प्रकरणांची संख्या वाढली.२०१८ मध्ये ५.३९ लाख प्रकरण प्रलंबित होते, ते २०१९ मध्ये वाढून ५.७० लाखांवर गेले. गुन्हेगारीचा दरही खूप कमी आहे. २०१८ मध्ये १३% प्रकरणांमध्ये हा दोष सिद्ध झाला होता, तर २०१९ मध्ये तो वाढून १४.६% झाला.

-लॉकडाऊनमध्ये महिलांवरील अत्याचार वाढले

महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी २३ सप्टेंबर रोजी लोकसभेत सांगितले की, मार्च ते २० सप्टेंबर या कालावधीत सरकारला महिलांवरील अत्याचाराच्या १३,४१० तक्रारी आल्या. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ५,४७० तक्रारी आल्या आहेत. त्यानंतर दिल्ली (१,६९७), महाराष्ट्र (८६५) आणि हरियाणा (७३१) कडून तक्रारी आल्या आहेत. मंत्रालयाने ७२१७७३५३७२ व्हाट्सएप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. ज्यावर १० एप्रिल ते २० सप्टेंबर दरम्यान १,४४३ प्रकरणे नोंदवली गेली.