धक्कादायक! कोरोना झालेल्या वृद्ध दाम्पत्यांनी नातवाला संसर्ग होऊ नये म्हणून ट्रेन समोर उडी घेऊन संपवलं आयुष्य

रविवारी सायंकाळी कोणालाही काहीही न सांगता हे वृद्ध दाम्पत्य घरातून निघून गेले. त्यानंतर त्यांनी कोटाहून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर रेल्वे समोर उडी मारुन आत्महत्या केली. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर रेल्वे कॉलिनी पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी या दोघांचेही मृतदेह एमबीएस रुग्णालयामध्ये नेले

    देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दिवसागणिक देशात तीन लाखांपेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. अशातच काहीजण कोरोनाच्या धास्तीने आत्महत्या करत आहेत. कोटा येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या एका वृद्ध दांपत्याने ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. आपल्यामुळे आपल्या नातवालाही कोरोनाचा संसर्ग होईल या भितीपोटी दांपत्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितलं जात आहे. या घटनेची सध्या संपूर्ण शहरामध्ये चर्चा सुरु असून कुटुंबियांना यामुळे जबर मानसिक धक्का बसलाय.पोलीस उपाधीक्षक भगवत सिंह हिंगड यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार संबंधित घटना रविवारी सायंकाळी घडली. येथे रेल्वे कॉलीनीमध्ये राहणारे हीरालाल बैरवा (वय ७५) आणि त्यांची पत्नी शांती बैरवा (वय ७५) हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं शनिवारी स्पष्ट झालं. आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने दोघेही तणावाखाली होते. त्यांनी घरीच क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्यामुळे आपला नातू रोहित याला कोरोनाचा संसर्ग होणार नाही ना अशी चिंता त्यांना होती.

    उचलले टोकाचे पाऊल
    रविवारी सायंकाळी कोणालाही काहीही न सांगता हे वृद्ध दाम्पत्य घरातून निघून गेले. त्यानंतर त्यांनी कोटाहून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर रेल्वे समोर उडी मारुन आत्महत्या केली. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर रेल्वे कॉलिनी पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी या दोघांचेही मृतदेह एमबीएस रुग्णालयामध्ये नेले. तेथील शवगृहामध्ये हे मृतदेह ठेवण्यात आले. त्यानंतर तपास केल्यावर या दोघांची ओळख पटली. तपासादरम्यान या दांपत्याचा मुलाचे आठ वर्षापूर्वी निधन झाल्याची माहिती समोर आली. मुलानंतर नातूही आपल्यापासून दूर जाईल आणि त्याला काही झालं तर आपण त्यासाठी जबाबदार असू अशी भीती या दोघांच्या मनात असल्याने त्यांनी आत्महत्या केली.