तामिळनाडूनंतर गुजरातमधील धक्कादायक प्रकार उघडकीस ; कस्टम विभागातून १.२० कोटींचे सोने गायब

गांधीनगर : तामिळनाडूमधील सीबीआय कोठडीमधून ४५ कोटींचे १०३ किलो ग्रॅम सोने गायब झाल्याची बातमी ताजी असतानाच सरकारी यंत्रणांना मान खाली घालवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे.

गांधीनगर : तामिळनाडूमधील सीबीआय कोठडीमधून ४५ कोटींचे १०३ किलो ग्रॅम सोने गायब झाल्याची बातमी ताजी असतानाच सरकारी यंत्रणांना मान खाली घालवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. आता गुजरातमधील जामनगरमध्ये कस्टम विभागाच्या कार्यालयातून १ कोटी २० लाखांचे सोने गायब झाले आहे. या प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी कस्टम विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे कर्मचारी गेल्या चार वर्षांपासून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

जामनगरच्या कस्टम विभागातून गायब झालेले सोने हे भूजच्या कस्टम ऑफिसमधील होते. भूजमध्ये २००१ साली झालेल्या भूकंपानंतर हे सर्व सोने जामनगरच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतर भूजच्या कार्यालयाने हा सोन्याचा साठा परत घेतला त्यावेळी त्यांना तब्बल १ कोटी १० लाखांचे २, १५६.७२२ ग्रॅम सोनं गायब झाल्याचे आढळून आले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांनी एफआयआर दाखल केली आहे.

असा झाला खुलासा
भूजमध्ये झालेल्या भुकंपामुळे कस्टम विभागाची इमारत पडली होती. त्यानंतर त्या ऑफिसच्या कस्टडीत असलेले ३,१४९.३९८ ग्रॅम सोनं सुरक्षित राहावे म्हणून जामनगरच्या ऑफिसमध्ये ठेवण्यात आले होते. हे सर्व सोनं दोन सुटकेस भरुन जामनगर कस्टम विभागाच्या ऑफिसमधील कोठडीत ठेवण्यात आले होते. भूज ऑफिसचे बांधकाम २०१६ साली पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी जामनगर कार्यालयातील सीलबंद सुटकेस ताब्यात घेतल्या. त्यावेळी त्या सुटकेसच्या किल्ल्या गायब होत्या. त्यानंतर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही सुटकेसचे कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर सोनं गायब असल्याचा खुलासा झाला. हे सोनं चोरीला गेल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे.