मेघालयात खाण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू

कामगार जेव्हा खाणीत खड्डा खोदत असताना अचानक यांत्रिक सांगाडा कोसळला. त्यानंतर हे सर्वजण एका खड्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती उपायुक्तांनी दिली. या दुर्घटनेत मृत झालेल्यांपैकी ५ जणांची ओळख पटली आहे.

शिलाँग : मेघालयच्या (Meghalaya) पूर्व भागातील जयंतिया हिल्स जिल्ह्यात एका अवैध कोळसा खाणीत (Coal Mine) यांत्रिक सांगाडा कोसळल्याने ६ खाण कामगारांचा मृत्यू झाला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. उपायु्क्त ई खारमाल्की म्हणाले की, ही घटना बुधवारी दिनेशलालू, सरकारी आणि रेयम्बई गावांच्या एका त्रिकोणी जंक्शनवर घडली.

या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कामगार जेव्हा खाणीत खड्डा खोदत असताना अचानक यांत्रिक सांगाडा कोसळला. त्यानंतर हे सर्वजण एका खड्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती उपायुक्तांनी दिली.
या दुर्घटनेत मृत झालेल्यांपैकी ५ जणांची ओळख पटली आहे. यापैकी अधिकजण हे शेजारच्या आसाममधील रहिवासी होते असंही खरमाल्की यांनी सांगितलं.

कामगार कोळसा खाण किंवा दगड उत्खनन कार्यात गुंतले होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी खाण मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहितीही उपायुक्तांनी दिली आहे.

विशेष म्हणजे डिसेंबर २०१८ मध्ये राज्यात अशाच खाण अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला होता.