या राज्यांनी केले पेट्रोलचे भाव कमी, नागरिकांना लिटरमागे ५ रुपयांचा दिलासा

सर्वसामान्य माणसाला या भाववाढीतून दिलासा मिळावा, यासाठी काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही अशी राज्यं आहेत, जिथं निवडणुका तोंडावर आहेत. महाराष्ट्रात मात्र अशी परिस्थिती नसल्यामुळे चढ्या दराने पेट्रोल घेण्याशिवाय नागरिकांकडे पर्याय नाही. 

    देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या भावानं धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी पेट्रोलनं शंभरी पार केलीय. डिझेलदेखील नव्वदी पार करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत या भाववाढीला आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या वाढत्या किंमतींचं कारण सरकार आणि पेट्रोलिअम कंपन्यांकडून देण्यात येतंय.

    सर्वसामान्य माणसाला या भाववाढीतून दिलासा मिळावा, यासाठी काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही अशी राज्यं आहेत, जिथं निवडणुका तोंडावर आहेत. महाराष्ट्रात मात्र अशी परिस्थिती नसल्यामुळे चढ्या दराने पेट्रोल घेण्याशिवाय नागरिकांकडे पर्याय नाही.

    या राज्यांनी केले दर कमी

    पश्चिम बंगाल, राजस्थान, आसाम आणि मेघालय या राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सध्या कपात करण्याचा निर्णय घेतलाय. राजस्थान सरकारनं तर जानेवारी महिन्यातच हे पाऊल उचललं. २९ जानेवारीला त्यांनी राज्यातील इंधनावरील व्हॅट (Value Added Tax) दोन टक्क्यांनी कमी करत ३८ टक्क्यांवरून ३६ टक्क्यांवर आणला. त्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने व्हॅटमध्ये प्रति लिटर १ रुपयाची कपात जाहीर केली. तर कोरोना काळात लावलेला अधिभार आसाम सरकारने मागे घेतला.

    आसाम आणि बंगाल या राज्यांमध्ये येत्या एप्रिल आणि मे महिन्यात निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे पाऊल उचललं जात असल्याचं सांगितलं जातंय. इतर राज्यांना मात्र असं करणं परवडणार नसल्याचं चित्र आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अगोदरच राज्यांच्या तिजोरीत खडखडाट असताना अशा प्रकारे कर कमी करणं इतर राज्यांना परवडणारं नसल्याचं चित्र आहे.