काँग्रेसची धुरा तूर्तास सोनिया गांधींकडेच

काँग्रेस कार्यसमितीची बैठक सात तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर संपली. या बैठकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते याला कारण म्हणजे काँग्रेसच्या २३ दिग्गज नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पूर्णवेळ अध्यक्ष आणि पक्षांमध्ये फेरबदल करण्यासंदर्भात मागणी केली होती. या पत्राला दिलेल्या उत्तरात सोनिया गांधींनी ‘मी अध्यक्षपद सोडायला तयार आहे, सर्वांनी नवीन अध्यक्ष शोधा’, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत या पत्रावरून घमासान होणार हे ठरले होते. सात तास चाललेल्या या बैठकीत नवीन अध्यक्षांच्या निवडीसह अनेक मुद्यांवर चर्चा झाली. अखेर चर्चेअंती काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी राहणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पुढील सहा महिन्यात नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया केली जाणार असून, तोपर्यंत सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

 

दरम्यान, राहुल गांधी यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवण्यावरून नाराजी व्यक्त करत नेत्यांना सुनावलं. पत्र पाठवण्याची वेळ चुकीची असून हे पत्र भाजपाला पूरक असल्याचा आरोपही बैठकीत झाला. यावरून झालेल्या गदारोळात काँग्रेसचे नबी आझाद यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. शेवटी सात तासांच्या चर्चेअंती हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी राहणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला.