नवी दिल्ली - कोरोना संकटाच्या महामारीतही सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालं आहे. भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत आज मंगळवार पेट्रोलच्या दरात ४७ पैशांची

नवी दिल्ली – कोरोना संकटाच्या महामारीतही सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालं आहे. भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत आज मंगळवार पेट्रोलच्या दरात ४७ पैशांची तर डिझेलच्या दरात ५७ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर हा ७६.७३ रूपये प्रतिलीटर आहे. तर डिझेलचा दर हा ७५.१९ रूपये प्रतिलीटर इतका झाला आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एकूण तीन रूपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तसेच काल सोमवारी पेट्रोलच्या दरात ४८ पैसे तर डिझेलच्या दरात ५९ पैशांची वाढ करण्यात आली होती.

दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्याकडून मंगळवारी पेट्रोल-डिझेल तसेच विमानाच्या इंधन दरात वाढ करण्यात आली. विमानाच्या इंधन दरात तब्बल १६.३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि इतर कारणांमुळे, जगभरातील कच्च्या तेल्याच्या किंमती निच्चांकी स्तरावर गेल्या आहेत. तरीही भारत सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सतत दर वाढवण्याचा निर्णय धक्कादायक आहे. त्यामुळे जनहित लक्षात घेऊन इंधन दरवाढीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्रातून केली आहे.