केंद्र सरकारविरोधात एकत्र येण्याचे सोनिया गांधींचे राज्यांना आवाहन

अर्थ स्थायी समितीच्या ११ ऑगस्टला झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने यावर्षी १४ टक्के नुकसान भरपाई देणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. सरकारने जीएसटी नुकसान भरपाईसाठी नकार देणे म्हणजे विश्वासघात आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांनी जीसटीच्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने राज्यांना आपण जीसटी नुकसान भरपाई देणार नसल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारने असे सांगणे म्हणजे विश्वासघात असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक बैठक बोलावली होती. ज्या बैठकीमध्ये बिगर भाजपशासित  राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते.

या बैठकीमध्ये सोनिया गांधी म्हणाल्या की, अर्थ स्थायी समितीच्या ११ ऑगस्टला झालेल्या बैठकीत  केंद्र सरकारने  यावर्षी १४ टक्के नुकसान भरपाई देणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. सरकारने जीएसटी नुकसान भरपाईसाठी नकार देणे म्हणजे विश्वासघात आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी संबंधित ज्या घोषणा करण्यात आल्यात त्याची चिंता वाटली पाहीजे. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि परीक्षांकडे दुर्लक्ष होत आहे. या गोष्टी बेजबाबदारपणे हाताळल्या जात आहेत. यासाठी सगळ्या राज्यांनी एकत्र आले पाहीजे, अशी विनंती सोनिया गांधी यांनी केली आहे. सर्वांनी एकत्र येऊन सुप्रीम कोर्टामध्ये जाऊयात. परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करुयात, असे त्या म्हणाल्या.