कृषी कायद्याचे समर्थन; भाजपा आमदाराला बेदम मारहाण

शेतकरी जमा होताना दिसताच पोलिसांनी अरुण नारंग यांना सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण शेतकऱ्यांनी पोलिसांच्या हातून अरुण नारंग यांना खेचले आणि कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, मुक्तसर.

    पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोटमध्ये शेतकऱ्यांनी भाजपा आमदार अरुण नारंग यांना बेदम मारहाण केली. शनिवारी घडलेल्या या घटनेत नारंग यांचे कपडे फाटले असून, त्यांना दुखापतही झाली आहे. अरुण नारंग अबोहरचे आमदार आहेत. नारंग कृषी कायद्याच्या समर्थनार्थ एक पत्रकार परिषद घेण्यासाठी मलोटला आले होते. शेतकऱ्यांना त्यांच्या येण्याची बातमी कळतचा शेकडो शेतकरी मलोटमधील भाजप कार्यालयाच्या बाहेर जमा झाले.

    शेतकरी जमा होताना दिसताच पोलिसांनी अरुण नारंग यांना सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण शेतकऱ्यांनी पोलिसांच्या हातून अरुण नारंग यांना खेचले आणि कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. यानंतर पोलिसांनी कसेबसे नारंग यांना एका दुकानात नेले. यानंतर शेतकऱ्यांनी त्या दुकानाबाहेर घोषणाबाजी करत नारंग यांच्या गाडीची तोडफोड केली.