सुप्रीम कोर्टाने केली पालिकेची स्तुती, दिल्ली सरकारला दिले ऑक्सिजन व्यवस्थापनासाठी ‘मुंबई मॉडेल’ वापरण्याचे आदेश

दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा(Oxygen Shortage in Delhi) निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी(Oxygen Management) मुंबई मॉडेल(Mumbai Model) स्वीकारण्याच्या सूचना केल्या आहेत. 

    नवी दिल्ली: मुंबई महापालिकेच्या ऑक्सिजन व्यवस्थापनाची सुप्रीम कोर्टाने स्तुती केली आहे.दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा(Oxygen Shortage) निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी मुंबई मॉडेल स्वीकारण्याच्या सूचना केल्या आहेत.

    दिल्लीत गेल्या काही आठवड्यांपासून ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे दिल्लीकरांना ऑक्सिजनसाठी वणवण भटकावे लागत आहे. याप्रकरणी आधी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आलं आहे. यावेळी कोर्टाने मुंबई महापालिकेने ज्या पद्धतीने ऑक्सिजनचं व्यवस्थापन केलं. ते मॉडल दिल्ली सरकारने अवलंबावे. दिल्ली सरकारने मुंबई महापालिकेकडून काही चांगल्या गोष्टी घ्याव्यात, असं कोर्टाने म्हटलं आहे. न्यायामूर्ती चंद्रचूड यांनी हा सल्ला दिला.

    मुंबई महापालिकेने कोरोना काळात चांगलं काम केलं आहे. अशावेळी दिल्लीने काही शिकलं पाहिजे. वैज्ञानिक पद्धतीने काम केलं पाहिजे, असं चंद्रचूड म्हणाले. चार अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकल्याने ऑक्सिजन येणार नाही. लोकांचे जीव कसे वाचतील याकडे लक्ष दिलं पाहिजे, असंही कोर्टाने सांगितलं.

    मुंबई मॉडेल हे काही राजकीय मॉडेल नाही. कोर्टातील अधिकारी हे काही केंद्र किंवा राज्यांचे नाही. आपल्याला यातून मार्ग काढला पाहिजे. मुंबई महापालिका काय करत आहे, कसे करत आहे? हे जाणून घ्या. महाराष्ट्र आता स्वत: ऑक्सिजन पुरवठा करू शकतो. ते दिल्ली करू शकत नाही, असंही कोर्टाने म्हटलं.

    जर दिल्लीचे आरोग्य सचिव आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याशी चर्चा झाली असेल, त्यात ऑक्सिजन स्टोरेज टँक कशा तयार करायच्या याची माहिती घेतली असेल तर दिल्लीसाठी हा प्लान कसा राबवणार याची माहिती आम्हाला द्या, अशी विचारणाही कोर्टाने केली.