नव्या राजकीय भूकंपाची नांदी; तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदार बंडखोरीच्या तयारीत

पश्चिम बंगालमध्ये येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. परंतु त्यापूर्वी आता वातावरण तापू लागलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये टीकेच्या फैरी झडत आहे. अशातच तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराने भाजपावर वादग्रस्त टीका केली आहे.

बीरभूम. पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होत चालल्याचे दिसून येत आहे. आता बीरभूम मतदारसंघातील टीएमसीच्या खासदार असलेल्या अभिनेत्री शताब्दी रॉय यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे बंडखोरीचे संकेत दिले आहेत. पक्षातील काही लोक त्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत त्या महत्त्वपूर्ण असा निर्णय घेऊ शकतात, यासाठी त्यांनी १६ जानेवारी दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ देखील निश्चित केला आहे. दरम्यान, शताब्दी रॉय यांनी तारापीठ विकास परिषदेचा राजीनामा दिला आहे.

लोक मला विचारतात की मी बीरभूममध्ये होणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित का राहत नाही ? मी कशी सामील होणार, जर मला त्यांचे वेळापत्रकच माहिती नसेल? मला वाटते की, काही लोकांची इच्छा आहे की मी तिथे असू नये. या नव्या वर्षात मला तुमच्यासोबत राहता यावे, यासाठी काही निर्णय घेण्याचा प्रयत्न मी करत आहे. २००९ सालापासून तुम्ही मला पाठिंबा दिल्याबद्दल तसेच मला लोकसभेत पाठवल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. भविष्यातही तुमचे हे प्रेम मला मिळत राहील अशी आशा आहे. मी खासदार होण्याआधीही बंगालच्या लोकांनी मला खूप प्रेम दिले. मी माझे कर्तव्य पार पाडत राहणार आहे. जर मी निर्णय घेतला तर १६ जानेवारीला दुपारी २ वाजेपर्यंत कळवेन.

- शताब्दी रॉय, खासदार टीएमसी

‘हे’ आहे नाराजीचे कारण
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर बीरभूमच्या खासदार जिल्ह्यात आयोजित केलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात क्वचितच दिसून आल्या. २८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बीरभूममध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. या सभेत ममता बॅनर्जी यांनी त्यांना योग्य ते महत्त्व दिले होते तसेच अनेकदा त्यांचे नावही घेतले होते. मात्र, जेंव्हापासून शताब्दी रॉय यांनी खासदार निधीचे पैसे जनतेमध्ये वाटले आहेत तेंव्हापासून स्थानिक नेते त्यांच्यावर नाराज आहेत. विकासकामांसाठी खासदार निधी खर्च करताना त्यांनी पक्षाचा सल्लादेखील घेतला नाही, असा आरोप त्यांच्यावर आहे. यामुळेच त्या नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

म्हणे, मानसिक त्रास होतोय्
अनेक कार्यक्रमांना आपल्याला आमंत्रितच करण्यात न आल्याने अनुपस्थित असल्याचे शताब्दी रॉय यांनी म्हटले आहे. काही लोकांना आपली भेट व्हावी असे वाटत नाही. अनेक कार्यक्रमांची माहितीच मला दिली जात नाही. जर मला माहितीच नसेल तर मी कसे जाणार? यामुळे मानसिक त्रास होत आहे, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, शताब्दी रॉय यांनी २००९ साली टीएमसीच्या तिकीटावर बीरभूममधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्या विजयी झाल्या होत्या. त्यानंतर त्या २०१४ तसेच २०१९ मध्येही जिंकल्या. याशिवाय त्या बंगाली सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच दिग्दर्शिका देखील आहेत.

भाजपा कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणू
पश्चिम बंगालमध्ये येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. परंतु त्यापूर्वी आता वातावरण तापू लागलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये टीकेच्या फैरी झडत आहे. अशातच तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराने भाजपावर वादग्रस्त टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी, भाजपा हा कोरोनापेक्षा अधिका घातक विषाणू असल्याची टीका केली आहे. भाजपा ही हिंदू आणि मुस्लीम यांच्यात दंगा घडवून आणते. जर भाजपा सत्तेत आली तर मुस्लिमांचे उलटे दिवस सुरू होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

भाजपाचा पलटवार
नुसरत जहाँ या उत्तर २४ परगनाच्या मुस्लीम बहुल भागामध्ये प्रचारासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपाची तुलना कोरोना विषाणूशी केली. तुम्ही सर्वजण डोळे उघडून ठेवा. भाजपासारखा धोकादायक विषाणू फिरत आहे. हा पक्ष धर्मांमध्ये भेदभव आणि व्यक्ती-व्यक्तींमध्ये भांडणे लावतो. जर भाजपा सत्तेत आली तर मुस्लिमांचे उलटे दिवस सुरू होतील, असे नुसरत जहाँ म्हणाल्या. दरम्यान, नुसरत जहाँ यांच्या वक्तव्यावर भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षावर मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप केला.

पश्चिम बंगालमध्ये लसीकरणावरून सर्वात वाईट राजकारण करण्यात येत आहे. सर्वप्रथम ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील मंत्री सिद्धीकुला चौधरी यांनी लसीची वाहतूक करणारा ट्रक थांबवला. आता दुसरीकडे तृणमूलच्या नेत्या प्रचारादरम्यान भाजपाची तुलना कोरोनाशी करत आहेत. परंतु ममता बॅनर्जी का शांत आहेत?, असा सवाल अमित मालवीय यांनी केला.