युवकाच्या कानशिलात मारणे जिल्हाधिकाऱ्यांना भोवले ; सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे आदेश

छत्तीसगडच्या सुरजपूर जिल्ह्यामध्ये औषधं आणण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी मोबाईल फोडून त्याला कानशिलात लावली आणि नंतर त्याला पोलिसांकडून मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असून मुख्यमंत्र्यांनी त्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती.

  रायपूर : आई-वडिलांची औषधं आणायला गेलेल्या एका युवकाला कानशिलात लावणे सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना चांगलंच भोवले आहे. याप्रकरणाची दाखल खुद्द मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी घेतली असून पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांचं तात्काळ निलंबन करावं असा आदेश मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिले आहेत. तसेच या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

  छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की, “सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी एका युवकाशी गैरव्यवहार केल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. ही घटना अत्यंत दु:खद आणि निंदनीय आहे. छत्तीसगडमध्ये अशा प्रकारचे वर्तन कधीही सहन केलं जाणार नाही. जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांना तात्काळ निलंबित केलं जात आहे.”

  मुख्यमंत्री भूपेश बघेल पुढे म्हणाले की, “प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून अशा प्रकारचे वर्तन स्वीकाहार्य नाही. या घटनेमुळे मला वेदना झाल्या आहेत. मारहाण झालेल्या त्या तरुण आणि कुटुंबाप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो.”

  नेमकं प्रकरण काय?