पंतप्रधानांनी लिहिले सर्व सरपंचांना पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन (जेजेएम) योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी देशातील सर्व सरपंच आणि ग्राम प्रधानांना पत्र लिहिले आहे. ग्रामीण समुदायातील नेत्यांच्या मदतीने जल जीवन मिशनचे लक्ष्य पूर्ण केले जाऊ शकते, असे त्यांनी एका अधिकृत निवेदनाद्वारे गुरुवारी म्हटले आहे.जल जीवन मिशनला लोकांचे आंदोलन बनवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना आणि ग्रामपंचायतींना केले आहे. २०२४ पर्यंत सर्व ग्रामीण घरांना पिण्याचे पाणी पुरविणे जेजेएमचे लक्ष्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निवेदनात मोदी म्हटले आहेत की, हे अभियान केवळ पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवणार नाही तर कॉलरा, अतिसार, एन्सेफलायटीस आणि विषमज्वर सारख्या पाण्यामुळे होणार्‍या आजारांवरही नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. तसेच, पशुधनांना शुद्ध पाणी दिले जाते तेव्हा त्यांचे आरोग्य सुधारते तसेच त्यांची उत्पादकता सुधारण्यात मदत होते परिणामी कुटुंबांचे उत्पन्न वाढते असेही ते म्हणाले.

पाण्याच्या टंचाईचा विपरित परिणाम महिला आणि मुलांवर कसा होतो यावर मोदींनी प्रकाश टाकला.“महिलांनी पाणी व्यवस्थापनात पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे कारण महिला हे काम उत्तम प्रकारे करू शकतात असे मोदी म्हणाले.रस्ता, घर, शौचालय, गॅस कनेक्शन, वीज, बँक खाते आणि सर्वांना पेन्शन देण्याच्या केंद्र सरकारच्या गेल्या सहा वर्षातील प्रयत्नांचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.