वाहनाच्या RC मध्ये वारसाचे नाव जोडण्याची प्रक्रिया आता सोपी होणार, नव्या गाइडलाइन्स जारी : वाचा सविस्तर

    नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या मालकाच्या नोंदणी प्रमाणपत्रात एखाद्या व्यक्तीला नॉमिनी करण्याची प्रक्रिया सहज-सोपी करण्यासाठी केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये काही बदल सूचित केले आहेत. या प्रकारच्या बदलामुळे मोटर वाहन मालकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीच्या नावे वाहन नोंदणी करणं किंवा हस्तांतरण करणं अधिक सोपं होईल. वाहन मालक आता वाहनाच्या नोंदणीवेळी नॉमिनी व्यक्तीचं नाव देऊ शकतात किंवा नंतर ऑनलाईन अर्जाद्वारेही करू शकतात. जुनी प्रक्रिया अतिशय जटील असून देशभरात ती वेगवेगळी आहे.

    नव्या गाइडलाइन्समधून उपलब्ध होईल ही सुविधा –

    अधिसूचित नियमांनुसार, नॉमिनी व्यक्तीचा उल्लेख झाल्यास, वाहन मालकाला त्या व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा सादर करावा लागेल. अधिसूचनेमध्ये असं सांगण्यात आलं, की ‘वाहन मालकाचा मृत्यू झाल्यास, वाहन मालकाने नोंदणीवेळी ज्या व्यक्तीला नॉमिनी केलं आहे, तो व्यक्ती तीन महिन्यांच्या कालावधीसाठी वाहन वापरू शकतो. परंतु यासाठी आवश्यक आहे, की नॉमिनी व्यक्तीने वाहन मालकाच्या मृत्यूच्या 30 दिवसांच्या आत त्याच्या मृत्यूची नोंदणी प्राधिकरणाकडे केली असावी आणि ते वाहन स्वत: वापरणार असल्याचं सांगितलेलं असावं.’

    फॉर्म 31 ने नॉमिनीच्या नावे होईल वाहन ट्रान्सफर –

    नॉमिनी व्यक्ती किंवा वाहनाची मालकी मिळवणारी व्यक्ती वाहन मालकाच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांच्या आत वाहन मालकी हस्तांतरणासाठी नोंदणी प्राधिकरणाकडे फॉर्म 31 मध्ये अर्ज करू शकते. तसंच घटस्फोट किंवा संपत्तीचं वाटप अशा परिस्थितीत वाहन मालक नॉमिनी व्यक्तीच्या नावात बदल करण्यासाठी मान्यताप्राप्त प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) सह नामांकनात बदल करू शकतो.