चिम्पांझी मानवापेक्षा स्वार्थी; संशोधनात आले समोर

संशोधनावेळी असे आढळून आले की, एकमेकांना मदत करण्याच्या बाबतीत चिम्पांझी जास्त तत्परता दाखवत नाहीत. जर आपल्याला फायदा होत नसेल तर ते दुसऱ्याला मदत करण्यात थोडीशीही उत्सुकता दाखवत नाहीत.

लंडन. चिम्पांझीला प्राणी वर्गांमधील एक हुशार प्राणी म्हणून ओळखले जाते. या प्राण्यावर नुकतेच एक संशोधन करण्यात आले. यामध्ये असे आढळून आले की, चिम्पांझी हे मानवापेक्षाही जास्त स्वार्थी असतात. म्हणजेच ते प्रत्येक बाबतीत आपलाच स्वार्थ पाहात असतात.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार चिम्पांझी हा प्राणी आपल्या सहकारी चिम्पांझीची मदत करतानाही आपल्याला कसा लाभ होईल, याचाच विचार करत असतो. तसे मानवाचे नसते. आनुवांशिक रूपाने मानव हा आपल्या लोकांप्रती दयाळू असतो. मात्र, चिम्पांझी असे नसतात. ते आपल्या लाभाशिवाय दुसऱ्यांच्या बाबतीत कोणत्याच प्रकारची उत्सुकता दाखवत नाहीत.

ब्रिटनमधील मँचेस्टर युनिव्हर्सिटी, सेंट अँड्र्यूज युनिव्हर्सिटी आणि जर्मनीतील मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्युशनरी अँथ्रोपोलॉजीच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. हे संशोधन युगांडामधील १६ चिम्पांझीवर करण्यात आले आहे.

संशोधनावेळी असे आढळून आले की, एकमेकांना मदत करण्याच्या बाबतीत चिम्पांझी जास्त तत्परता दाखवत नाहीत. जर आपल्याला फायदा होत नसेल तर ते दुसऱ्याला मदत करण्यात थोडीशीही उत्सुकता दाखवत नाहीत. उल्लेखनीय म्हणजे चिम्पांझी हे आपले कोणतेही काम करत असताना त्याचा दुसर्‍यावर कोणता परिणाम होईल, याचा जरासुद्धा विचार करत नाहीत.