रणनीती ठरली! आगामी अधिवेशनात केंद्र सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेस सज्ज

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवरून अधिवेशन वादळी ठरू शकते. कोरोना संकट, महागाई, शेतकऱ्यांचे आंदोलन, राफेल व्यवहाराबाबत झालेले गौप्यस्फोट या मुद्यांवरून वातावरण तापू शकते.

    नवी दिल्ली : आगामी पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली असून या अधिवेशनात काय रणनीती असावी यासंदर्भांत बैठक घेण्यात आली. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

    समितीत यांचा सहभाग
    या तीन सदस्यीय समितीत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आणि के. सी. वेणुगोपाल यांचा सहभाग आहे. लोकसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद के. सुरेश यांनी सांगितले की, अधिवेशनाची रणनीती तयार करण्यासाठी सोनिया गांधी आगामी काही दिवसांत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलविणार आहेत. लोकसभेतील उपाध्यक्षपद दोन वर्षांपासून रिक्त असून त्यासाठी निवडणूक घेण्याची मागणी लोकसभा अध्यक्षांना करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवरून अधिवेशन वादळी ठरू शकते. कोरोना संकट, महागाई, शेतकऱ्यांचे आंदोलन, राफेल व्यवहाराबाबत झालेले गौप्यस्फोट या मुद्यांवरून वातावरण तापू शकते.