धक्कादायक! हा तर असमानतेचा व्हायरस : लॉकडाऊनमध्ये १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण १०० मोठ्या अरबपतींची संपत्ती ३५% नी वाढली

महामारी दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एवढा पैसा १ तासात कमावला, तेवढा पैसा कमवायला एखाद्या अकुशल कामगारालाही १० वर्षांचा कालावधी लागेल. मार्च २०२० मध्ये मुकेश अंबानी यांची संपत्ती २.७ लाख कोटी रुपये होती. ऑक्टोबरमध्ये ही दोन टक्क्यांहून अधिक वाढत ५.७ लाख कोटी रुपये झाली. ६ महिन्यांत त्यांच्या संपत्तीत तीन लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

  • ऑक्सफेमचा 'द इनइक्वलिटी व्हायरस' अहवाल
  • भारतातील १०० सर्वात गडगंज श्रीमंतांच्या संपत्ती मार्च २०२० नंतर १३ लाख कोटी रुपयांनी वाढली
  • ही रक्कम १४ कोटी गरिबांमध्ये वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला येतील ९४ हजार रुपये
  • एकूण ११ अरबपतींच्या संपत्तीत जेवढी वाढ झाली ती मनरेगाच्या १० वर्षांच्या अर्थसंकल्पाच्या तरतुदी समान आहे
  • महामारीमुळे देशातील १२.२ कोटी कर्मचाऱ्यांनी गमावला रोजगार
  • जेफ बेजोस ॲमेझॉनच्या ८.७६ लाख कर्मचाऱ्यांना ७६.५ लाख रुपये बोनस देत होते, तरीही त्यांच्याकडे महामारीपूर्वी पूर्वीएवढीच संपत्ती आजही आहे

गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान देशातील सर्वात मोठ्या १०० गर्भश्रीमंतांची संपत्ती ३५ % नी वाढली. रकमेच्या दृष्टीने विचार केल्यास यात १३ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. NGO ऑक्सफेम (Oxfam) च्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. याची दुसरी बाजू ही देखील आहे की, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी १२ कोटींहून अधिक लोकांना आपल्या नोकरीला तिलांजली द्यावी लागली.

गरिबांना महामारीपूर्वीची स्थिती प्राप्त व्हायला एक दशक लागणार

‘द इनइक्वलिटी व्हायरस’च्या अहवालानुसार, महामारीने भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात असामनता वाढविली आहे. जगातील सर्वात मोठ्या १,००० अरबपतींच्या स्थिती तर ९ महिन्यांतच सुधारली, पण गरिबांना कोरोनापूर्वीच्या स्थितीत येण्यासाठी एका दशकाहून अधिक काळ जावा लागणार आहे. ऑक्सफेम दावोस सम्मेलनाआधी हा अहवाल जारी करत असते.

श्रीमंतांची संपत्ती एवढी वाढली की, यामुळे प्रत्येक गरिबाला मिळू शकले असते ९४ हजार रुपये

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीच नव्हे, कुमार मंगलम बिर्ला, गौतम अदानी, अजीम प्रेमजी, सुनिल मित्तल, शिव नाडर, आणि लक्ष्मी मित्तल सारख्या उद्योगपतींची संपत्तीही या दरम्यान वेगाने वाढली आहे. देशातील सर्वात मोठ्या १०० अरबपतींच्या संपत्तीत मार्च २०२० नंतर जवळपास १३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ही रक्कम देशाच्या सरंक्षण अर्थसंकल्पाच्या जवळपास चारपट आहे. जर हा पैसा १४ कोटी गरिबांमध्ये वाटला तर प्रत्येकाच्या वाट्याला ९४,०४५ रुपये येतील.

मुकेश अंबानींची संपत्ती दर तासाला ६९ कोटी रुपयांनी वाढली

महामारी दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एवढा पैसा १ तासात कमावला, तेवढा पैसा कमवायला एखाद्या अकुशल कामगारालाही १० वर्षांचा कालावधी लागेल. मार्च २०२० मध्ये मुकेश अंबानी यांची संपत्ती २.७ लाख कोटी रुपये होती. ऑक्टोबरमध्ये ही दोन टक्क्यांहून अधिक वाढत ५.७ लाख कोटी रुपये झाली. ६ महिन्यांत त्यांच्या संपत्तीत तीन लाख कोटी रुपयांची वाढ झाली. म्हणजेच त्यांची संपत्तीत दर महिन्याला ५०,००० कोटी रुपये, दररोज १,६६७ कोटी रुपये आणि दर तासाला ६९ कोटी रुपयांनी वाढ झाली. दुसरीकडे असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठीची कमीत कमी मजुरी १७८ रुपये आहे. त्यांना ६९ कोटी रुपये कमावण्यासाठी १०,००० वर्षांहून अधिक कालावधी लागेल.

दर तासाला १.७ लाख जण झाले बेरोजगार, एकूण १२.२ कोटी लोकांनी गमावला रोजगार

एकीकडे श्रीमंत, अधिक श्रीमंत झाले, दुसरीकडे एप्रिलमध्ये प्रत्येक तासाला १.७ लाख लोकांनी रोजगार गमावला. अहवालानुसार, कोरोना महामारीमुळे १२.२ कोटी कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं. यात ७५%लोकं म्हणजेच जवळपास ९.२ कोटी लोकं असंघटित क्षेत्रातले आहेत. याशिवाय, उपासमार, आत्महत्या, रस्ते आणि रेल्वे दुर्घटना, पोलिसांचा छळ आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने असंघटित क्षेत्रातल्या ३०० हून अधिक कामगारांचा मृत्यू झाला. ऑक्सफेम नुसार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एप्रिल २०२० पर्यंत मानवाधिकारांच्या उल्लंघनाची २,५८२ प्रकरणे नोंद केली आहेत.

११ अरबपतींच्या कमाईने पूर्ण होऊ शकतो १० वर्षांचा मनरेगाचा अर्थसंकल्प

अहवालानुसार, कोरोना महामारीच्या काळात भारतातील एकूण ११ अरबपतींच्या संपत्तीत जेवढी वाढ झाली आहे, या पैशांतून १० वर्षांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) किंवा १० वर्षांपर्यंत आरोग्य मंत्रालयाचा खर्च भागविला जाऊ शकतो.

जगभरात गरिबांची संख्या ५० कोटींनी वाढली

अहवालात नमूद केलं आहे की, जगभरात १८ मार्चपासून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत अरबपतींच्या संपत्तीत ३.९ ट्रिलियन डॉलर (२८४ लाख कोटी रुपये) वाढ झाली. या दरम्यान जगातील १० सर्वात मोठ्या अरबपतींची संपत्ती ५४० बिलियन डॉलर (३९ लाख कोटी रुपये) वाढली आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत, जेफ बेजोस सप्टेंबर २०२० मध्ये ॲमेझॉनच्या सर्व ८.७६ लाख कर्मचाऱ्यांना ७६.५ लाख रुपये बोनस देत होते, त्यानंतरही त्यांच्याकडे महामारीपूर्वीच असलेली संपत्ती तसूभरही कमी झालेली नाही. दुसऱ्या बाजूला गरिबांची संख्या ५० कोटींनी वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार महामारीने ६ कोटी लोकांना भीषण गरिबीला सामोरं जावं लागलं आहे.

९ महिन्यांची कमाई सर्वांना मोफत लस देण्यासाठी पुरेशी आहे

अहवालानुसार, कोरोना विषाणू आल्यानंतर जगातील १० सर्वात मोठ्या अरबपतींनी जेवढी संपत्ती कमावली, ती जगात प्रत्येकाला गरिबीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी आणि सर्वांना एक कोविड-१९ लस मोफत देण्यासाठी पुरेशी आहे. अहवालात सांगितल्याप्रमाणे, कोरोना विषाणूने दाखवून दिलं आहे की, जगातील मानवतेकडे गरिबीतून मुक्त होण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा नाही. या संकटात अरबपतींच्या संपत्तीचा लाखो लोकांचे संसार आणि कोट्यावधी लोकांचे रोजगार वाचविण्यासाठी वापर करायला हवा.