ग्वाल्हेरमध्ये खळबळ : कडेकोट सुरक्षा असतानाही ज्योतिरादित्य शिंदेंच्या जयविलास पॅलेसमध्ये चोरी

अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जयविलास पॅलेसमध्ये चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलिसही धास्तावले आहेत. एकामागोमाग एक असे मोठमोठे पोलीस अधिकारी पॅलेसमध्ये दाखल झाले आहेत.

    मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरचे भाजपाचे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या जय विलास पॅलेसमध्ये चोरी झाली आहे. धक्कादायक म्हणजे सुरक्षा कडक असूनही येथे चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. ज्योतिरादित्य शिंदे ग्वाल्हेर मुक्कामी असताना याच पॅलेसमध्ये वास्तव्यास असतात.

    अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जयविलास पॅलेसमध्ये चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलिसही धास्तावले आहेत. एकामागोमाग एक असे मोठमोठे पोलीस अधिकारी पॅलेसमध्ये दाखल झाले आहेत. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम जयविलास पॅलेसमध्ये दाखल झाली असून चोरी झालेल्या भागातील हातांचे ठसे आणि पुरावे गोळा करत आहे. याशिवाय श्वानाचीही मदत घेण्यात येत आहे.

    सध्यातरी चोरांनी या पॅलेसमधून काय चोरी केले याची अद्याप माहिती मिळालेली नाही. सीएसपी रत्नेश तोमर यांच्यानुसार चोर जय विलास पॅलेसमध्ये असलेल्या राणी महालाच्या एका खोलीच्या छतावरून हे चोर आतमध्ये आले होते. या खोलीची तोडफोडही करण्यात आली आहे. राणी महलाच्या बाजूला या खोलीमध्ये स्टोअर आहे जिथे साहित्य आजूबाजूला टाकले गेले होते. पोलीस या खोलीत आलेल्या चोरांची संख्या किती होती आणि त्यांनी काय काय चोरी केले हे शोधले जात आहे.

    जयविलास पॅलेस हा ग्वाल्हेरच्या राजघराण्याचा म्हणजेच शिंदे घराण्याचा महाल आहे. जय विलास पॅलेस हा १२ लाख स्क्वेअर फिटहून अधिक आहे. या सुंदर शाही महालाची किंमत जवळपास ४००० कोटी रुपये आहे. महालात ४०० हून अधिक खोल्या आहेत. याचा एक हिस्सा राजघराण्याचा इतिहास दाखविण्यासाठी संग्रहालयासाठी वापर केला जातो. भाजपाचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे ग्वाल्हेर मुक्कामी असताना परिवारासोबत याच महालात राहतात. हा पॅलेस चारही बाजूंनी सुरक्षारक्षकांनी वेढलेला असतो. यामुळे इथे चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.