Tirumala temple was surrounded by flood waters Heavy rains in Andhra Pradesh
तिरुमला मंदिर पुराच्या पाण्याने वेढले; मुसळधार पावसाने आंध्रात पूरस्थिती!

तिरुमला मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. मंदिर ट्रस्टचे कर्मचारी यंत्राच्या साहाय्याने पुराचे पाणी ओसरण्यासाठी कामाला लागले होते. श्रीवरी मंदिरासमोर बऱ्याच वर्षांनंतर पाणी साचल्याची माहिती मंदिर ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

हैदराबाद (आंध्रप्रदेश) : बंगालच्या उपसागरात आलेल्या निवार चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या चित्तूर आणि नेल्लूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या दोन्ही जिल्ह्यातील नदीच्या पातळीत वाढ झाली असून पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठचे रस्ते पाण्याखाली गेल्याने काही भागातील शहर आणि ग्रामीण भागांचा संपर्क तुटला आहे.

आंध्रातील एरपेडू, मोदुगुला पाडू, कुम्मारी मिट्टा आणि चेन्नामपल्ली गावे पाण्याखाली गेली आहेत. पापानायडू पेटाजवळील सुवर्णमुखी नदीला पूर आल्याने मद्दीला पालेम आणि गोविंदपुरम गावात पाणी शिरले असून पचिकापलमच्या टीटीडी कल्याण मंडपमजवळ वीजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

तमिळनाडू आणि पुदुच्चेरीला झोडपले

बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार चक्रीवादळ बुधवारी (ता.२५) मध्यरात्री अडीचनंतर तमिळनाडू आणि पुदुच्चेरीतील किनारपट्टीवर धडकले.१३० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे आणि धुवाधार पावसाने दोन्ही राज्यातील अनेक भागांना बुधवारी झोडपून काढले. तमिळनाडूत पावसाने तीन नागरिक मृत्युमुखी पडले तर तीन जण जखमी झाला. शेकडो झोपड्यांचे नुकसान झाले. वाऱ्यामुळे पडलेली ३८० पेक्षा जास्त झाडे हलविण्यात आली आहेत. अत्यावश्‍यक सेवा सुरळीत झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव अतुल्य मिश्रा यांनी गुरुवारी (ता.२६) दिली.

२ लाखांहून अधिक जणांनी केले स्थलांतर

चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने किनारपट्टीवरील सुमारे दोन लाखाहून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलविले होते. पुदुच्चेरीच्या उत्तरेकडील ३० किलोमीटर अंतरावरील मरक्कनम या समुद्र किनाऱ्यावरील शहराला ‘निवार’ धडकल्यानंतर एका तासाने या अति तीव्र चक्रिय वादळाचे रूपांतर तीव्र वादळात झाले. हा वादळाचा धोका कमी झाला असला तरी पुदुच्चेरी व तमिळनाडूतील चेन्नई, कराईकल, नागपट्टणम येथे कालपासूनच पाऊस पडत असल्याने अनेक भागात पूर आला होता.

तमिळनाडूत १२ इंच इतका विक्रमी पाऊस

तमिळनाडूत काही तासात १२ इंच असा विक्रमी पाऊस पडला. विहिरीची भिंत कोसळल्याने व अन्य घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, शेकडो झाडे, विजेचे खांब उन्मळून पडली, झोपड्यांचेही नुकसान झाले. बचाव पथकाने झाडे हटवून रस्ते रिकामे केले आहेत. चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे चेन्नईतील विमानतळ आणि मेट्रो सेवा कालपासून बंद ठेवली होती. ती गुरुवारी दुपारपासून पुन्हा सुरू झाली. वादळाच्या प्रभावित क्षेत्रात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) बाराशे जवान कालपासून तळ ठोकून होते, अशी माहिती ‘एनडीआरएफ’चे प्रमुख एस. एन प्रधान यांनी दिली.

 

तिरुमलात मुसळधार

प्रसिद्ध तिरुमला येथेही मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे दृष्यमानता कमी झाली असून वाहतूकही मंदावली आहे. पावसामुळे तिरुमलाच्या दुसऱ्या घाट रस्त्यावर थांबलेल्या एका बोलेरो वाहनावर मोठा दगड पडला. त्यामुळे वाहनाची हानी झाली. गाडीतील पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले. हे भाविक हैदराबादचे आहेत.

दरम्यान, तिरुमला मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. मंदिर ट्रस्टचे कर्मचारी यंत्राच्या सहाय्याने पुराचे पाणी ओसरण्यासाठी कामाला लागले होते. श्रीवरी मंदिरासमोर बऱ्याच वर्षांनंतर पाणी साचल्याची माहिती मंदिर ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी दिली. रात्रीपासून पाऊस पडत असल्याने राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

तिरुपती ते तिरुमला जाणाऱ्या भाविकांना अलीपिरी सप्तगिरी चेक पोस्टवरच ताकीद दिली जात होती. वाहनचालकांनी आपली वाहने कमी वेगाने चालवावी, असे आवाहन टीव्हीटीचे कर्मचारी करत होते.