जवानांनी पुलवामात केला जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामातील अवंतीपोराच्या नागबेरियन त्रालच्या जंगल परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती भारतीय सुरक्षा दलांना मिळाली होती. गुप्तचरांच्या आधारे सुरक्षा दलांनी बीएसएफ आणि स्थानिक पोलिसांसह एक टीम तयार केली. माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले.

    जम्मू -काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्रालच्या जंगली भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. या संदर्भातील माहिती जम्मू -काश्मीर पोलिसांनी दिली आहे. आतापर्यंत दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही.

    पुलवामातील अवंतीपोराच्या नागबेरियन त्रालच्या जंगल परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती भारतीय सुरक्षा दलांना मिळाली होती. गुप्तचरांच्या आधारे सुरक्षा दलांनी बीएसएफ आणि स्थानिक पोलिसांसह एक टीम तयार केली. माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले.

    स्वतःला घेरलेले पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलांनाही गोळीबार करावा लागला. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात जैशचे तीन दहशतवादी ठार झाले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार लष्कराने अजूनही संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू आहे.

    जम्मू -काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये शुक्रवारी सकाळी चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. हे दोन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. सुरक्षा दलांनी त्यांच्याकडून एके 47 रायफल आणि पिस्तूल जप्त केले होते.