अमेरिकेची भारताला महामदत; एका आठवड्यात करणार इतक्या रुपयांच्या साहित्याचा पुरवठा

    नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे भफारताची परिस्थिती खराब होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या या कोरोना विरोधातल्या लढ्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अमेरिकेनेही या कामाता आता पुढाकार घेतला असून येत्या आठवड्यात भारताला 7.41 अब्ज रुपयांच्या साहित्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचं व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

    दरम्यान भारताच्या या कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये अमेरिका भारताला शक्य तितकी मदत करेल आणि भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिल असं व्हाईट हाऊसच्या एका निवेदनात सांगण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताला या आठवडाभरात 7.41 अब्ज रुपयांच्या कोरोना संबंधित साहित्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या साहित्यामध्ये 1000 ऑक्सिजनचे सिलेंडर, 1.5 कोटी N-95 मास्क आणि दहा लाख रॅपिड डायग्नोस्टिक चाचण्या यांचा समावेश आहे.

    भारतासाठी दोन कोटी लसींची निर्मीती करण्याचे अॅस्ट्राझेनेकाला निर्देश

    व्हाईट हाऊसने अमेरिकन लस उत्पादक कंपनी असलेल्या अॅस्ट्राझेनेकाला निर्देश दिले आहेत की, लवकरात लवकर कोरोनाच्या अतिरिक्त लसींचे उत्पादन करावं आणि ते भारताला पाठवावं. भारताला मदत करण्यासाठी अमेरिकेने अॅस्ट्राझेनेकाला दोन कोटीपेक्षा अधिक लसींचे उत्पादन करण्याची परवानगी दिली आहे.