उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने घेतलाय ‘हा’ निर्णय, योगी-मोदींच्या डोक्याला ताप वाढणार

काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये कुठल्याही पक्षांसोबत आघाडी करणार नसल्याचे सांगत कुठल्याही आघाडीशिवाय निवडणूक लढवून स्वबळावर पुढचे सरकार स्थापन करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये असल्याचा विश्वास अजय कुमार लल्लू यांनी व्यक्त केला. तसेच काँग्रेस पुढीलवर्षी उत्तर प्रदेशमध्ये होणारी विधानसभा निवडणूक प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याची घोषणा करत लल्लू यांनी काँग्रेस राज्याच्या सत्तेत तीन दशकांनंतर पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला.

  लखनऊ : लोकसंख्या आणि विधानसभा सदस्यांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीला आता काही महिने राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागले आहेत. उत्तर प्रदेशात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काँग्रेसनेही ही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मोठी घोषणा केली आहे.

  काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये कुठल्याही पक्षांसोबत आघाडी करणार नसल्याचे सांगत कुठल्याही आघाडीशिवाय निवडणूक लढवून स्वबळावर पुढचे सरकार स्थापन करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये असल्याचा विश्वास अजय कुमार लल्लू यांनी व्यक्त केला. तसेच काँग्रेस पुढीलवर्षी उत्तर प्रदेशमध्ये होणारी विधानसभा निवडणूक प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याची घोषणा करत लल्लू यांनी काँग्रेस राज्याच्या सत्तेत तीन दशकांनंतर पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला.

  पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये लल्लू म्हणाले की, काँग्रेस दमनकारी उत्तर प्रदेश सरकारला आव्हान देणार प्रमुख पक्ष म्हणून समोर आला आहे. ४०३ सदस्य असलेल्या विधानसभेमध्ये केवळ पाच सदस्य असलेला काँग्रेस पक्ष ४९ आमदार असलेल्या समाजवादी पक्षापेक्षा अधिक प्रभावी विरोधी पक्ष ठरला आहे. तसेच राज्यात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत असे सांगत अजय कुमार लल्लू म्हणाले की, ‘’बदलाव की आंधी है जिसका नाम प्रियंका गांधी है’’ अशी घोषणाच लल्लू यांनी दिली.

  काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, प्रियंका गांधींच्या नेतृत्वामध्ये राज्यात विविध स्तरांवर काँग्रेसची पक्ष संघटना मजबूत झाली आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार का बनवू नये, असे विचारले असता लल्लू यांनी सांगितले की, मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला चेहरा बनवले पाहिजे याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व घेईल. प्रियंका गांधी ह्या राज्याच्या प्रभारी आहेत आणि त्यांच्या देखरेखीखालीच विधानसभा निवडणूक लढवली जाईल.

  त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशचे लोक काँग्रेसकडे अपेक्षेने पाहत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचेच सरकार बनेल. दरम्यान, काँग्रेसच्या महासचिव असलेल्या प्रियंका गांधी ह्या या महिन्यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. जिथे त्यांचे लक्ष्य हे कॅडरला उत्साहित करणे आणि पक्षाला सत्ताधारी भाजपासोबत सुरू असलेल्या निवडणुकीच्या लढाईसाठी तयार करण्याचे असेल.

  या निवडणुकीत काँग्रेस सपा आणि बसपासोबत आघाडी करणार का? असे विचारले असता लल्लू म्हणाले की, काँग्रेस जनता, शेतकरी, गरीब, महिला आणि दलितांसोबतच्या मुद्यांशी आघाडी करणार आहे. काँग्रेस या आघाडीसह लोकांसमोर जाईल आणि आम्हाला जनतेची साथ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.